नमस्कार मंडळी,  

‘या देवी सर्व भूरेषू शक्तिरूपेण संस्थिता’ असे म्हणत सुष्टाच्या दुष्टावरील विजयाचे पर्व अर्थात नवरात्र संपता संपताच वेध लागतात ते दिवाळीचे. विजयादशमीच्या दिवशी रावणाचा पराभव करून अयोध्येला परतलेल्या रामाचे स्वागत म्हणजे दिवाळी ! ‘दिवाळी सण मोठा नाही आनंदाला तोटा’. वर्षभर ज्याची चातकाच्या आतुरतेने वाट पहिली जाते असा सण  म्हणजे दिवाळी. दिवाळी म्हणजे आनंद,दिवाळी म्हणजे उत्साह,दिवाळी म्हणजे उजळलेले असंख्य दिवे,दिवाळी म्हणजे स्वप्नांचे आकाश नवे.. दिवाळी म्हणजे थंडीची सुरुवात,दिवाळी म्हणजे स्नेहाची रुजुवात,दिवाळी म्हणजे फराळाची साठवण, दिवाळी म्हणजे एकमेकांची आवर्जून काढलेली आठवण….असे अनेक संदर्भ आपल्या लहानपणच्या दिवाळीला आहेत.जसजसे आपण मोठे होत जातो तसतसे या प्रत्येक दिवसाच्या मागचे खोल अर्थ कळायला लागतात,मग नरकचतुर्दशीच्या दिवशी मारला गेलेला नरकासुर हा केवळ पौराणिक राहात नाही तर आपल्या अवतीभवतीच दिसायला लागतो. कधी करोंनाच्या रूपात तर कधी नैराश्य,दारिद्र्य,व्यसन यांच्या रूपात.त्यांचा नाश हीच आजच्या काळातली नरकचतुर्दशी. पर्यावरणरूपी लक्ष्मीची आदराने केलेली जपणूक म्हणजे लक्ष्मीपूजन. ‘हे विश्वचि माझे घर’ अशा भावनेने जगातल्या सीमा ओलांडून  

धरलेले स्नेहाचे बंध म्हणजे खऱ्या अर्थाने साजरी केलेली पाडवा,भाऊबीज.दिवाळीचे संदर्भ असे व्यापक होत गेले तर कोणाच्याच आनंदाला तोटा राहणार नाही हे नक्की. 

मंडळी, बृ. म. मं. अधिवेशन जसजसे जवळ येते आहे आहे तसतसे एकएक सरप्राइज एलिमेंट तुमच्यासमोर आम्ही उघडतो आहोत.आता यावेळेची नवीन गोष्ट म्हणजे अधिवेशनाच्या निमित्ताने आम्ही नृत्यरंग,नाट्यरंग आणि स्वररंग आशा नाट्य,अभिनय आणि गाण्याच्या स्पर्धा आयोजित केल्या आहेत. या स्पर्धा १ नोव्हेंबर पासून सूरू होतील. अधिक माहितीसाठी www.bmm2022.org या संकेतस्थळाला भेट द्या.  

आणि आता त्याहून उत्साहवर्धक बातमी म्हणजे पहिल्यांदाच BMM आणि Happydemic यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धांच्या विजेत्यांना व्यावसायिक पातळीवर नेण्याचा आमचा प्रयत्न आहे.त्याचाच एक भाग म्हणजे ‘स्वररंग’  च्या विजेत्या गायकांना सुप्रसिद्ध गायक शान यांच्यासोबत गाण्याची संधी मिळेल.अधिक माहितीसाठी हा विडियो बघा. https://www.youtube.com/watch?v=LbaiTqaMz-0.  

२१ ऑक्टोबरला आम्ही कॅन्व्हेंशन समितीने ऑल हॅन्ड्स मिटिंग साठी अटलांटिक सिटी न्यू जर्सी कॅन्व्हेंशन सेंटर ला भेट दिली . जवळजवळ १०० + स्वयंसेवकानीं मीटिंग अटेंड केली. त्याचा डिटेल वृत्तांत पुढच्या वृत्तात प्रकाशित होईल. 

तर मग मंडळी,आम्ही तर लागलोच आहोत तुम्हीही लागा लवकर तयारीला.  

लक्ष दिव्यांच्या या उजळल्या ज्योती  

मनामनातल्या वाटा प्रकाशून जाती… 

व्यक्तिमत्त्वाचा प्रत्येक पैलू उजळून टाकणारी ही  दिवाळी तुम्हाला सुख,समृध्दी,आरोग्य,समाधान घेऊन येणारी असो ही शुभेच्छा. 

आपली नम्र,
बृहन महाराष्ट्र मंडळ अध्यक्षा
विद्या जोशी