नमस्कार मंडळी,
सकाळी उठल्याबरोबर अगदी न चुकता आजचं वातावरण कसं असेल हे बघण्याची सवय एव्हाना अंगवळणी पडलीय नाही का! भारतात असताना कधीही असं हवामान बघून बाहेर पडल्याचं आठवत नाही. मग अशावेळी अवचित पावसानं गाठल्यानंतर उडालेली तारांबळ किंवा थंडीच्या दिवसांत धडाधड पेटलेल्या शेकोट्या आणि त्याभोवती न ठरवता रंगलेल्या मैफिली आठवल्या की आता फार मजा वाटते. अशावेळी वाटतं की ठरवूनच एखाद्या दिवशी ‘वेदर चेक’ करायचं विसरावं आणि रस्त्यात अचानक बर्फवृष्टी होते का यांची वाट बघावी.भारतातले असे छोटे छोटे क्षण पुन्हा जगू पाहण्याचा वेडेपणा आपण इथे नेहमीच करत असतो. मातीशी जोडलेली नाळ सहजासहजी तुटत नाही हेच खरं !
मातीशी जोडलेल्या या नात्याचाच उत्सव म्हणजे आपलं बृहन्महाराष्ट्र मंडळाचं अधिवेशन’२०२२.म्हणता म्हणता अगदी सहा महिन्यांवर येऊन ठेपलं आहे. हे अधिवेशन म्हणजे तुमच्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव व्हावा यासाठी गेल्या कित्येक महिन्यांपासून जोरदार तयारी चालली आहे. अनेक उत्तमोत्तम कार्यक्रमांची निवड खास तुमच्यासाठी आम्ही केली आहे. यामध्ये नॉर्थ अमेरिकेतील ‘रसिकांच्या हृदयस्थ तारा’(बे एरिया), ‘शेक्सपियर एक्सपरिमेंट’ (डॅलस), ‘ऐक रंगदेवते तुझी कहाणी’ (शिकागो), जरीपटका (वॉशिंग्टन डी सी), कॅम्प वलीवडे (न्यू जर्सी), ‘मराठी अस्तित्त्व’ (ह्यूस्टन) या नाटकांचा एक आगळा वेगळा अनुभव आपल्याला मिळेल. याचबरोबर भारतातील प्रथितयश कलावंतांमध्ये शंकर महादेवन यांची मैफिल,आमने सामने’ ,सारखे काहीतरी होतेय’ अशा कार्यक्रमांची मेजवानी आहे.
केवळ संस्कृतिकच नाही तर आपल्या व्यवसायालाही पूरक असे हे अधिवेशन ठरेल. विशेषतः आपला व्यवसाय आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा अतिशय खात्रीचा मार्ग म्हणजे BMM स्मरणिका.अधिक माहितीसाठी या संकेतस्थळाला भेट द्या. https://bmm2022.org/smaranika-bmm2022/
मंडळी, ‘मनाचा मुजरा’ या उपक्रमाबद्दल मागच्या अंकात आपल्याला सांगितले होतेच.हा मानाचा मुजरा BMM Convention तर्फे दर महिन्यात उत्तर अमेरिका व कॅनडा मधील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आपल्या लोकांना दिला जाणार आहे.या उपक्रमाला सीमा शहाणे यांच्या नेतृत्त्वाखाली आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे.त्याचप्रमाणे उत्कृष्ट विडियो संपादनासाठी राधिका देसाई( कनेक्टीकट) यांचे विशेष आभार.
खरंतर संपूर्ण BMM टीमच अधिवेशन सर्वोत्तम आणि सुरक्षित व्हावे म्हणून अथक प्रयत्न करीत आहे.कोविड विषयीची सर्व बंधने पाळूनही आपल्याला अधिवेशनाचा उत्कृष्ट अनुभव घेण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितच करीत आहोत.
आता थोडा आढावा घेऊ या आपल्या नैमित्तिक उपक्रमांचा.मानसिक आरोग्यासाठीच्या सत्रात २० फेब्रुवरी रोजी न्यू जर्सी येथील १५ वर्षांपासून होमियोपथी आणि स्वास्थ्य सुपदेशक म्हणून कार्यरत असणाऱ्या वैशाली भिडे यांचे सत्र पार पडले.मानसिक ताण आणि नैराश्य दूर करण्यासाठी होमिओपॅथीची उपयोगिता यावरील त्यांचे मार्गदर्शन सध्याच्या कोविड काळात तर फारच उपयुक्त ठरेल.
‘लेखक तुमच्या भेटीला’ मध्ये ‘मनतरंग’ आणि ‘व्यक्तछटा’ या ई-पुस्तकांचे लेखक अमित भावे यांची कोमल चौक्कर यांनी घेतलेली मुलाखत गाजली. या ई पुस्तकांसाठी तुम्ही पुढील लिंकवर जाऊ शकता. https://www.amazon.com/s?k=amit+bhave&crid=PS7NZY68H400&sprefix=amit+bhave%2Caps%2C209&ref=nb_sb_noss_1
आपल्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे BMM चा कराओके गाण्याचा कार्यक्रम २७ फेब्रुवारी रोजी धडाक्यात पार पडला. अजित नातू यांनी सुरुवातीपासूनच या उपक्रमात पुढाकार घेतला. त्यांचे विशेष आभार.
मंडळी,येणाऱ्या महिला दिनाच्या निमित्ताने ‘माहेर’ मासिकाने विशेष मुलाखत घेऊन मला सन्मानित केले आहे. हे ‘माहेर’ लहानपणापासूनच माझ्या जिव्हाळ्याचे.कुठल्याही फळाची अपेक्षा न करता काम करीत जाताना अशी शाबासकीची थाप पाठीवर मिळाली म्हणजे उत्साह द्विगुणित होतो.तुम्हा सगळ्यांच्या सहकार्यानेच हे घडते हेही आवर्जून सांगावेसे वाटते.
शेवटी बाहेर काय किवा आयुष्यात काय ‘वेदर’ कुठलाही असो आपल्या मातीने दिलेली प्रेमाची आणि कौतुकाची ऊब मात्र अशीच कायम मिळत रहावी एवढीच इच्छा !!
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपली नम्र
बृहन महाराष्ट्र मंडळ अध्यक्षा
विद्या जोशी