नमस्कार मंडळी. सर्व प्रथम, सर्वांना नुकत्याच होऊन गेलेल्या मकर संक्रांतीच्या माझ्या कडून आणि बीएमएम २०२२ च्या टीम कडून शुभेच्छा

बीएमएम २०२२ च्या अधिवेशनाची तयारी जोरात सुरू आहे. बर्‍याच महत्त्वपूर्ण निर्णयांवर काम चालू आहे. बहुतांश समित्यांचे अध्यक्ष नेमले गेले आहेत. बऱ्याच समित्यांना चांगले स्वरूप येत आहे.

सध्याच्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे आम्हाला बर्‍याच आघाड्यांवर अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. राज्य प्रशासनाने एकत्र येण्यास बंदी घातल्यामुळे, व्यक्तिशः लोकांना एकत्रितपणे भेटणे अशक्य  झाले आहे. जरी परिस्थिती आमच्यासाठी अनुकूल नसली तरी बीएमएम २०२२ च्या अधिवेशन समितीचा उत्साह कमी झाला नाही. लोकांशी संपर्क साधण्यासाठी समितीने विविध पर्याय शोधले. यामुळे आम्ही विविध समित्यांवर कार्य करण्यासाठी स्वयंसेवकांशी संपर्क साधू शकलो आणि विविध समित्यांना स्वयंसेवकांकडून भरपूर पाठिंबा मिळत आहे. वेगवेगळ्या समित्यांनी झूम कॉलवर एकत्र संपर्क साधून आपापल्या समितीचे काम सुरू केले आहे.

तीन दिवसाच्या या अधिवेशनात सुमारे ५००० पाहुण्यांची उपस्थिती अपेक्षित आहे. आधीच न्यू जर्सी हा भाग महाग, त्यात आपल्या बीएमएम अधिवेशनाच्या गरजा इतर कुठल्याही अधिवेशनापेक्षा वेगळ्या आहेत. पाहुण्यांची रुचकर खाण्यापिण्याची व्यवस्था, हजारांच्या संख्येसाठी समांतर मनोरंजनाचे कार्यक्रम होऊ शकतील असे भव्य कॉन्व्हेंशन सेंटर आणि अश्या भव्य कॉन्व्हेंशन सेंटरमध्ये उपस्थितांना एक संस्मरणीय अनुभव आणि सुंदर आठवणी  देता येईल असे ध्येय आम्ही बाळगून आहोत.

बीएमएम २०२२ च्या अधिवेशनासाठी अटलांटिक सिटी, न्यू जर्सी यजमान शहर म्हणून निवडण्यात आले आहे. अटलांटिक सिटी, न्यू जर्सी मधील एक किनारपट्टी रिसॉर्ट शहर आहे, जे कॅसिनो, बोर्डवॉक आणि समुद्रकिनारे यासाठी ओळखले जाते. हे अधिवेशन ११ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट २०२२ या कालावधीत होईल.कॉन्व्हेंशन सेंटर बरोबर पहिल्या टप्प्याच्या  वाटाघाटी पूर्ण झाल्या आहेत आणि लवकरच आम्ही या करारास अंतिम रूप देऊ.

कार्यस्थळ तर नक्की झालं, आत्ता त्याच्या जवळ, सोयीच्या, योग्य दराच्या हॉटेलच्या खोल्या पाहुण्यांसाठी नक्की करणे, हॉटेलपासून कॉन्व्हेंशन सेंटर पर्यंत येण्याजाण्यासाठी बसची व्यवस्था करणे अश्या विविध कामांना सुरवात झाली आहे.

अधिवेशनातील महत्वाची व सर्वांच्या आवडीची गोष्ट म्हणजे, आपल्या मित्रमंडळीबरोबर सुग्रास भोजनाचा आस्वाद घेणे. कारण त्याच वेळेस गप्पांसाठी कसली आडकाठी नसते आणि तीन दिवस आयते जेवण म्हणजे तर पर्वणीच. त्या बरोबर नुसतेच मनोरंजनचे कार्यक्रम नसून, आपल्या मनाला आनंद देतील, आपल्या विचारांना चालना देतील असे विविध कार्यक्रमाचे आयोजन.

हे सर्व प्रत्यक्षात उतरण्यासाठी हमी द्यावी लागते हजारोंच्या आकड्यात आणि खर्च होतो लाखोंचा घरात. अर्थातच देणग्यां च्या स्वरूपात गंगाजळी जमवावी लागते. मग एवढ्या मोठ्या प्रमाणात अधिवेशन करण्याची गरज आहे का ? एवढे मोठं कॉन्व्हेंशन सेंटर घेण्याची जरुरत आहे का ? असा प्रश्न पडतो. उत्तर आहे अर्थातच!! कारण ५ हजारहून अपेक्षित उपस्थिती असलेल्या अधिवेशनासाठी प्रशस्त कॉन्व्हेंशन सेंटर, दर्जेदार कार्यक्रम, रुचकर भोजनाची मेजवानी आवश्यक आहे.  ५००० लोकांसाठी अधिवेशन आयोजित करणे हे ५०० लोकांसाठी अधिवेशन आयोजित करण्याच्या दहा पट अवघड नसतं, तर ते १०० पटीने अवघड असतं! साधारण २.५ ते ३.० मिलियन डॉलर्स चे बजेट असल्यामुळे अधिवेशनाचा आवाका मोठा आहे आणि म्हणूनच निधी उभारणी सर्वात महत्वाचा भाग आहे. प्रत्येक यजमान मंडळ खर्च नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतात. परंतु आजची वस्तुस्तिथी अशी आहे की देणगीदारांच्या पाठिंब्याशिवाय अधिवेशन आयोजित करणे अशक्य आहे.
याचा अर्थ म्हणजे जवळपास निम्म्या बजेटचा खर्च आपले देणगीदार उचलत असतात. आता या देणगीदारांमध्ये दोन प्रकार आहेत. वैयक्तीक देणगीदार (Individual Donors) आणि व्यवसायिक देणगीदार (Corporate Donors).
वैयक्तीक देणगीदार म्हणजे तुमच्या, आमच्यासारखे लोक, जे प्रवेशिकेच्या पलीकडे जाऊन दोन, पाच, दहा, पंचवीस हजार डॉलर्स किंवा त्याहून अधिक रकमांची देणगी देतात. एका उत्सवाच्या रूपात होणाऱ्या या अधिवेशनाच्या यशामागे अनंत हात कार्यरत असतात. वैयक्तीक देणगीदार होऊन ही अधिवेशनरुपी गणपतीची विशाल मूर्ती उचलण्यास अजून एका हाताचे बळ द्यावे व हे कार्य सिद्धीस नेण्यास हातभार लावावा ही विनंती.  तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेच.

अधिक माहितीसाठी आम्हाला bmm2022.org वर भेट द्या
चला तर मग पुढच्या महिन्यात पुन्हा भेटूया, आपल्या अधिवेशनाच्या तयारीचा एक नवीन आढावा घेऊन

Welcome to BMM 2022

प्रशांत कोल्हटकर
न्यू जर्सी २०२२ संयोजक