नमस्कार मंडळी,
तुम्हा सर्वांना येणाऱ्या नवीन वर्षांच्या मनःपूर्वक शुभेच्छा!


या नवीन वर्षाचं स्वागत करण्याच्या वगवेगळ्या तऱ्हा जगभरात प्रचलित आहेत बरं का! लंकाशायर व यॉर्कशायर (लंडन) मध्ये जुन्या वर्षाला घालवण्यासाठी संपूर्ण घरभर झाडू घेऊन फिरून नववर्षाचं स्वागत होतं तर डेन्मार्क मध्ये मित्रांच्या घरासमोर काचेची बशी फोडून त्यांच्यासाठी ‘गुडलक’ चिंतलं जातं.रात्री बाराच्या ठोक्याला उंचावरून एखादी वस्तू खाली फेकण्याची प्रथा अर्थात न्यू यॉर्कचा सुप्रसिद्ध ‘बॉल ड्रॉप’ तर आपल्याला माहीत आहेच.थोडक्यात,उत्साह जल्लोष आणि नव्या अपेक्षांसह नव्या वर्षाचं स्वागत प्रत्येकजण करत असतो. तसंच २०२२ चं स्वागत आपण मोठ्या जल्लोषात केलेलं आहे आणि हे वर्ष सगळ्यांना भरभराटीचं जावो अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.
खरंतर,सरत्या वर्षाच्या पाऊलखूणा येणाऱ्या नव्या वर्षाला वाट दाखवीत असतात.डिसेंबर महिन्यात पार पडलेले आपले कार्यक्रम येणाऱ्या वर्षातील कार्यक्रमांची पूर्वतयारीच होती असं म्हणायला हरकत नाही.त्यापैकीच एक म्हणजे बृममं टाऊन हॉल मीटिंग.४ डिसेंबर रोजी पार पडलेल्या या बैठकीत आपल्या सगळ्या उपक्रमांचा आढावा घेण्यात आला.तसेच २०२२ मधील उपक्रम आणि बहुप्रतीक्षित अशा बीएमएम अधिवेशनविषयी चर्चा करण्यात आली.
डिसेंबर महिन्यात आपण आयोजित केलेला सगळ्यात गोड इवेंट म्हणजे ‘रेशीमगाठी’ या वधूवरसूचक संकेतस्थळावर नाव नोंदवलेल्या उपवर आणि वधूंचे भरवलेले पहिले प्रत्यक्ष संमेलन. आतापर्यंत या संकेतस्थळावर १०० च्या वर अधिक उपवर-वधूंनी नोंदणी केली आहे.त्यातील काहींना प्रत्यक्षात भेटताना आणि बोलताना बघणं खरोखर आनंददायक होतं. उत्तम प्रतिसादात हे संमेलन पार पडले.या माध्यमातून अनेकानेक रेशीमगाठी जूळून येवोत अशी इच्छा.
‘प्रसंगी अखंड वाचित जावे’ हा वसा घेऊन चाललेला आपला उपक्रम ‘लेखक तुमच्या भेटीला’ मध्ये या महिन्यात लेखिका अनिता कुलकर्णी यांची मुलाखत झाली.आर्किटेक्ट,मॅगनोलिया,जिप्सी,खोलगट बशीतलं शहर,समाजरंग या पुस्तकांच्या लिखिकेशी दिलखुलास गप्पा यानिमित्ताने मारता आल्या.
गेल्या दोन वर्षांपासून घोंगावणाऱ्या करोनाच्या संकटाला आपण सर्वांनी तोंड दिलं ते सुदृढ मानसिक स्वास्थ्याच्या बळावरच. मानसिक स्वास्थ्याला प्रोत्साहन देणाऱ्या आपल्या उपक्रमात ‘संजीवनी’ च्या प्रमिलाकुमार यांचे मार्गदर्शन मिळाले.उत्तम प्रतिसादात हा कार्यक्रम पार पडला.
आपला मनातल्या गाण्यांचा कार्यक्रम अर्थात कराओके संगीत रजनी सुट्ट्यांमुळे या महिन्यात न करण्याचे ठरवले होते.पण जानेवारी महिन्याच्या ३० तारखेला मात्र नक्की भेटूया.
मंडळी, २०२२ च्या अधिवेशनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या एका वैशिष्ट्यपूर्ण स्पर्धेविषयी सांगायला मला आवडेल. BMM च्या इतिहासात पहिल्यांदाच एका वैशिष्ट्यपूर्ण पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भाग घेतलेल्या सर्व स्थानिक स्पर्धकांचे मनःपूर्वक कौतुक आणि विजेत्यांचे अभिनंदन.२० नोव्हेंबेर रोजी पार पडलेल्या या स्पर्धेतील विजेत्यांचे पदार्थ आपल्याला अधिवेशनातच सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या पदार्थांबरोबर चाखायला मिळणार आहेत. तेव्हा या पंक्तीला हजेरी लावायला विसरू नका.
दिवसामागून दिवस आणि ऋतूमागून ऋतु सरतो.आठवणींचा सोनचाफा मात्र मनात उरतो.सरत्या वर्षातल्या असंख्य आठवणींचा दरवळ मनात घेऊन नव्या वर्षाला सामोरे जाऊ या.पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या शुभेच्छा!कळावें, लोभ असावा.


आपली स्नेहांकिता,
सौ. विद्या रवींद्र जोशी
अध्यक्षा, बृहन्महाराष्ट्र मंडळ, उत्तर अमेरिका