Virginia Event

Jari Patka

Which State?

Virginia

Key Performer

Kalavishkar Inc

When

महाराष्ट्र. – ‘या मातीचे कण लोहाचे, तृणपात्यांना खड्गकळा’ असं जिचं वर्णन केलंय ती भूमी. ज्या मायभूमीची आपण सर्व लेकरं आहोत त्या भूमीला एक इतिहास आहे, एक परंपरा आहे. शेकडो वर्षांच्या, पिढ्यानपिढ्यांच्या पराक्रमाने, सांडलेल्या रक्ताने, अश्रूंनी, अथक परिश्रमांच्या गाळलेल्या घामाने हा इतिहास बनलेला आहे. आसेतुहिमाचल पसरलेल्या भारतवर्षावर परकीय आक्रमण झाल्यावर जिथे आपल्या देशातल्या मोठमोठ्या राजसत्ता कोसळल्या तिथे दर्‍याकपार्‍यांमधे, डोंगरदर्‍यांमधे, रानावनांमधे लपून त्या सत्तेला आव्हान दिलं गेलं ते आपल्या या भूमीतून. चिवटपणाने, शौर्याने, न डगमगता, शक्तीवर युक्तीने मात करून इथे एक नवा इतिहास रचला गेला. एक नवी राजसत्ता अस्तित्त्वात आली. शेकडो वर्ष चिरडलेल्या भूमीतून उगवलेला हा अंकुर महावृक्षामधे रूपांतरित झाला. सुमारे पावणेदोनशे वर्षं टिकून राहिलेल्या, विस्तार पावलेल्या या आपल्या मराठी सत्तेने आपल्या राज्यविस्ताराबरोबरच अनेक परकी आक्रमकांना तोंड दिलं, त्यांना रोखलं, त्यांनी केलेल्या अन्याय-अत्याचारांपुढे प्रतिकार उभा केला.

पुरुषार्थाच्या निरनिराळ्या छटांमधे रंगलेल्या, सत्ताकारण, युद्धशास्त्र, वीरश्री, पराक्रम, अशा वेगवेगळ्या गुणांचं दर्शन घडवणार्‍या या काळाचा पट उलगडणारा कार्यक्रम खास उत्तर अमेरीकावासी मराठी जनांकरता , घेऊन येतेय ‘कलाविष्कार’ ही संस्था.

जन्मानी सदेह रूपात लाभणारं अस्तित्व खऱ्या अर्थी मिळतं ते भाषा, भूमी आणि धर्मानी. जगाच्या नकाशावर अनेक धर्म ,अनेक पंथ, अनेक भाषा ,पण हिंदू धर्म आणि त्याचं अस्तित्व फक्त आपल्या मायदेशात-भारतात. आणि त्याच हिंदू धर्मच सर्व तत्वज्ञान सामावलंय भाग्य रंगात ,भगव्या झेंड्यात . हे प्रतीक आलं कुठून आणि त्याला अस्तित्व प्राप्त कुणी करून दिलं ?
आपल्या इतिहासातल्या सर्व घटनांना जो साक्षी होता, विजयाच्या प्रसंगी जो डौलाने फढफडला, अपयशामधे जो मराठी रक्तात न्हाऊन निघाला तो मराठी महासत्तेचा मानबिंदू, तिचं प्रतीक असलेला ‘जरीपटका’. त्याचंच नाव या कार्यक्रमाला देत आहोत.

वॉशिंग्टन महाराष्ट्र मंडळ आणि कलाविष्कार संयुक्त विद्यमाने हा क्वाड्रॅफोनिक साउंड मधला भव्य प्रयोग निर्माण करत आहेत. दोन तसंच कालावधी असलेल्या या प्रयोगात १० ऐतिहासिक प्रसंग , काही गाणी व नृत्य आणि कथानकाला पुढे नेणारे व्हिडीओ असे समाविष्ट आहे. संपूर्ण रेकॉर्डद ट्रॅकवर ”जाणता राजा ” सारखा हा प्रयोग आहे.
याची संकल्पनाच अशी आहे कि भगवा झेंडाच आपला प्रवास सांगत आहे. शौर्यानं , मानानं , बलिदानानं , अभिमानानं ज्यांनी ज्यांनी त्याची प्रतिष्ठा उंचावली ,त्या सर्वांचं स्मरण तो आपल्याला करून देतोय.
पार्श्वभागी उभ्या केलेल्या एल इ डी स्क्रिनवर त्याचे दृष्य भाग दिसतील.