नमस्कार मंडळी,

बीएमएम २०२२ अधिवेशनाच्या तयारीचा एक नवीन आढावा घेऊन मी पुन्हा आपल्यासमोर आलो आहे.
मला अशी आशा आहे कि तुम्ही तुमच्या उन्हाळ्याच्या सुट्टीतला कार्यक्रम नक्कीच निश्चित केला असेल आणि तुमच्यापैकी बहुतेकांनी बीएमएम अधिवेशनासाठी न्यू जर्सीला येण्याची योजना आखली असेल. आपल्या अधिवेशनासाठी आता अडीच महिन्यांपेक्षा कमी वेळ उरला आहे. नावनोंदणी(रजिस्ट्रेशन) केलेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे सर्वांचा उत्साह आणि उत्कंठाही आता शिगेला पोहोचली आहे. तुम्ही अद्याप तुमचे तिकीट बुक केले नसेल, तर कृपया आमच्या वेबसाइट https://bmm2022.org/registration/ ला भेट देऊन नोंदणी करा.
मागच्या दोन महिन्यात BMM २०२२ टीमने अमेरिकेतल्या विविध मराठी मंडळांना भेटी दिल्या आणि त्यांनी आयोजित केलेल्या अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांना जातीने हजेरी लावून त्याचा आनंद लुटला. संपूर्ण उत्तर अमेरिकेतील मराठी समुदायापर्यंत पोहोचणे आणि त्यांच्याशी संपर्क साधणे आणि त्यांना बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या न्यू जर्सी येथे होऊ घातलेल्या आगामी अधिवेशनाला उपस्थित राहण्याचे वैयक्तिक निमंत्रण देणे हा या भेटीचा मुख्य उद्देश नजरेसमोर ठेऊन आम्ही डेट्रॉईट, अल्बानी, न्यू इंग्लंड, डेलावेर, फिलाडेल्फिया, सिएटल, क्लीव्हलँड, शिकागो, वॉशिंग्टन डीसी आणि बे एरिया ह्या मंडळाच्या कार्यक्रमांना उपस्थित होतो.

अनेक प्रश्नांवर मात करत आणि अडथळ्यांची शर्यत पार करत समित्यांची कामे मोठ्या आत्मविश्वासाने, काठोकाठ भरलेल्या उत्साहाने पूर्णत्वाला नेत आहेत. हे अधिवेशन भव्यदिव्य होण्यासाठी आणि अविस्मरणीय ठरण्यासाठी स्वयंसेवकांची सर्व पातळ्यांवर वेगवान घोडदौड चालू आहे, समस्त न्यू जर्सी सज्ज होत आहे.

अधिवेशनाच्या महत्वाच्या घडामोडी:
1.  नेवार्क आणि फिलाडेल्फिया विमानतळ ते अटलांटिक सिटी कन्व्हेंशन सेंटर आणि परतीच्या प्रवासाची व्यवस्था राज्याबाहेरून येणाऱ्या आमच्या सर्व पाहुण्यांसाठी वाजवी दरात करण्यात आली आहे. त्वरित या सेवेचा आपण लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी https://bmm2022.org/airport-transportation/ संकेतस्थळाला नक्की भेट द्या.
2.  बीएमएम २०२२ च्या अधिवेशनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या बहुतांश स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून कलागुणांना वाव देणे हे मात्र एक ध्येय आहे. प्रत्येकाच्या कलेची माध्यमं वेगवेगळी असतात. बीएमएम २०२२ च्या अधिवेशनात केवळ नृत्य गाणे आणि नाटक स्पर्धाच एवढाच नव्हे तर फोटोग्राफी आणि पेंटिंगचे प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले आहे. सर्व स्पर्धांना रसिक, कलाकारांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल आम्ही सर्व सहभागींचे आभारी आहोत.
3.  ह्या अधिवेशनाच्या वेळी प्रकाशित होणाऱ्या आपल्या स्मरणिकेचे काम सुद्धा वेगाने चालू आहे. जगभरातून प्रतिसाद लाभलेल्या अनेक लेखकांच्या, कवींच्या, चित्रकारांच्या वैविध्यपूर्ण लेख व इतर कलाकृतींनी हि स्मरणिका सजते आहे. सर्व उपस्थित प्रेक्षकांना ती अधिवेशनात सुपूर्द करण्यात येईल. हा अंक सर्वांगाने परिपूर्ण आणि देखणा होण्यासाठी आमची स्मरणिका समिती विशेष लक्ष देत आहे. अधिवेशनाच्या आठवणींचा खजिना ह्या स्मरणिकेच्या रूपात कायमस्वरूपी आपल्याकडे राहील, ऑनलाइनच्या ह्या नव्या जमान्यात तिची ऑडिओ प्रत सुद्धा उपलब्ध असणार आहे. आपल्या भाषेतून आपल्या आवडत्या विषयावर हातात अंक घेऊन वाचायची गोडी काही औरच. हा अंक सगळ्यांना आवडेल यात काही शंका नाही.
4.  अधिवेशन आपल्या कला आणि संस्कृतीचे अभिमानास्पद प्रदर्शन असले पाहिजे परंतु त्याच वेळी आपण पर्यावरणाप्रती असलेल्या आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवली पाहिजे. एवढे मोठे समारंभ करायचे म्हणजे पर्यावरणा च्या बाबतीत तडजोड होते, खरं तर दुर्लक्ष होते. या अधिवेशनात पर्यावरणला काही अंशी प्राधान्य देण्याचे आम्ही ठरवले आहे परिणामी आम्ही ‘GO GREEN’ उपक्रम स्वीकारला आहे. ह्या अधिवेशनाच्या नियोजनबद्ध आखणीमध्ये उच्च दर्जाच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देताना काही बाबींमधे प्लास्टिकचा वापर कमी करणे आणि नैसर्गिक उपलब्ध साधने वापरणे अर्थातच पर्यावरणाचा समतोल राखणे हा मुख्य उद्देश ठेवून त्यावर भर देण्यात आले आहे. जेवण वाढण्यासाठी लागणारी आवश्यक कटलरी, सजावटीचे सामान, गिफ्ट बॅग आणि मॅगझिनसाठी टिकाऊ उत्पादनांचा वापर अधिवेशनात तुमच्या लक्षात येईल.
5.  ३ ते १३ वयोगटातील मुलांकरता “डे केअर” आवश्यक सोयींनी परिपूर्ण असेलच पण त्यामधे मुलांचे मनोरंजनाचे आणि त्यांना गुंतवून ठेवणारे उपक्रम असणार आहेत शिवाय मराठी संस्कृती जोपासण्याचा भाग म्हणून मराठी कार्यशाळेचाही अंतर्भाव करण्यात येणार आहे. लहान मुलांच्या कार्यक्रमासाठी विशेष तसदी घेण्यात आली आहे. त्यामुळे सर्व पालकांना निर्धास्त मनाने अधिवेशनाची मजा लुटता येणार आहे.
6.  एक्स्पो मधील स्टॉल्स बऱ्याच अंशी बुक झाले आहेत. आपल्या व्यवसायासाठी ही नामी संधी आहे. एक्स्पो समितीला संपर्क करून आपण अजूनही स्टॉल्स आरक्षित करू शकता. सर्व प्रेक्षकांना विशेषकरून महिलांना खरेदीचा आनंद घेता येईल.
7.   प्रोग्रामिंग आघाडीवर आम्हाला हे सांगण्यास आनंद होत आहे की सर्व नियोजित कार्यक्रमांसाठी व्हिसा याचिका मंजूर करण्यात आल्या आहेत आणि व्हिसा स्टॅम्पिंग पुढील महिन्यात किंवा त्यापूर्वी केले जाणे अपेक्षित आहे.

अधिक माहितीसाठी https://bmm2022.org संकेतस्थळाला नक्की भेट द्या.

‘सोहळा अस्तित्वाचा’ आपल्या सर्वांच्या विक्रमी उपस्थितीत संपन्न होवो अशी प्रभुचरणाशी प्रार्थना करून मग आता तुमचा इथेच निरोप घेतो. पुढील आढावा घेऊन मी परत पुढच्या महिन्यात तुमच्यासमोर येईन.

न्यू जर्सीच्या भूमी, रचलाय आम्ही सोहळा अस्तित्वाचा
जाज्वल्य अभिमान आम्हाला, आमच्या मराठी अस्मितेचा
व्हा तुम्ही साक्षीदार, लावून अधिवेशनाला उपस्थिती,
आग्रहाचे निमंत्रण तमाम रसिकांना, ठेवून श्री गणराया साक्षी

Welcome to BMM 2022
प्रशांत कोल्हटकर
न्यू जर्सी
बीएमएम २०२२ संयोजक