नमस्कार मंडळी,

नुकतीच होळीच्या रंगांची उधळण संपली आणि वसंतऋतूचे वेध लागले.पण चंद्रशेखर गोखले लिहतात त्याप्रमाणे,
वाळकं पान गळताना सांगतं
वसंत आता येणार आहे
वसंत ओरडतच येतो
मी लगेच जाणार आहे…
अशा अश्वगतीनं ऋतुचक्र फिरत असतं.हे सहा ऋतूंचे सोहळे दरवेळी नवीच भासणारी रंगांची उधळण करून जातात.मनामनांत उत्साह संचारतो आणि आपण उत्सवाची कारणे शोधू लागतो.असाच एक उत्सव संस्कृतीचा, भाषेचा,मराठी मनाचा, मराठीपणाचा.. अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे तो म्हणजे बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन.मंडळी, अधिवेशनाची तयारी जोरात सुरू आहेच.पण हे संपूर्ण अधिवेशन पर्यावरण पूरक व्हावं म्हणून विशेष काळजी घेतली जाते आहे.
तर असं हे वेगवेगळ्या रंगांत रमणारं आपलं मन.नैराश्याच्या रंगातही तेवढ्याच लवकर बुडून जातं.नैराश्याची वाळवी मनाला एकटेपणाच्या खोल दरीत केव्हा घेऊन जाते ते कळतही नाही. रोजच्या जगण्यातले साधे ताण मोकळे करता आले तर या टोकाला जाणे आपण टाळू शकतो.आपल्या मनःस्वास्थ्य या सदरात यावेळी मनिषा भिडे यांच्याशी या विषयावर झालेली चर्चा नक्कीच उपयुक्त ठरली.
‘लेखक तुमच्या भेटीला’ मध्येही वेगवेगळ्या लेखकांशी संवाद साधण्याचा आपला प्रयत्न असतो.यावेळी ‘कर्करोग - माहिती आणि अनुभव’ या पुस्तकाच्या लेखिका डॉक्टर सुलोचना गवांदे यांची डॉ. विद्या जोशी यांनी घेतलेल्या मुलाखतीतून वैद्यकीय विषयावरील या पुस्तकाबद्दल आणि विषयाबद्दल बरीच माहीती मिळाली.
मनाचा ऋतू म्हणजे आनंद, दुःख,प्रेम,आवेश असा कोणताही असू द्या… तो व्यक्त करण्याचा मार्ग म्हणजे मनापासून गाणे. तुमच्या मनातली गाणी ऐकण्यासाठी BMM कराओके मंच नेहमीच उत्सुक असतो.या महिन्यातली आपली कराओके मैफिल जमणार आहे ३ एप्रिल रोजी. यावेळची थीम आहे हिंदी -मराठी होळीगीतं किंवा कोळीगीतं.तेव्हा आपली गाणी गाण्यासाठी आणि कार्यक्रम ऐकण्यासाठी पुढील सिंकवर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/Dhi3JOMzzke4l19zbdsOm9

हन महाराष्ट्र मंडळ ही संस्था सभासद मराठी मंडळांची सस्था आहे. बृ.म.मं ने आपल्या सर्वांच्या मदतीने गेली ४० वर्षे सभासद मंडळांसाठी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. तसेच शैक्षणिक, सेवा, ईत्यादी उपक्रम राबवले आहेत आपले काम ही आपल्या सगळ्यांचीच कौतुकाची, अभिमानाची गोष्ट असते . आपल्या सर्व सभासद मंडळांना हीच गोष्ट हे अभिमानाने सांगता यावी म्हणून आम्ही एक “A Proud BMM Member” / “आम्ही बृहन महाराष्ट्र” हा लोगो तयार केला आहे . प्रत्येक मंडळाने आपल्या मंडळाच्या वेबसाईट वर अभिमानाने हा लोगो लावावा. BMM – Bruhan Maharashtra Mandal (bmmonline.org)च्या अंतर्गत असलेल्या सर्व उपक्रमांचा सभासद मंडळांना लाभ घेता येतो. तसेच कालनिर्णय , liability इन्शुरन्स , Trade Marking या सेवा ही उपलब्ध आहेत. या नवीन उपक्रमाला आम्हाला भरघोस प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व मंडंळाचे मनःपूर्वक आभार.

जाता जाता, “मानाच्या मुजरा’ च्या मानकऱ्यांची नावे आहेत मुकुंद मराठे आणि आशीष चौगुले.यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
मंडळी,आयुष्यातला एकेक ऋतू वेचत चाललेला आपल्या सर्वांचा हा प्रवास एकमेकांच्या साथीनं अधिकच रंगमय आणि समृद्ध होवो हीच येणाऱ्या वसंतोत्सवानिमित्त शुभेच्छा!

तर भेटूया लवकरच
कळावें, लोभ असावा.

आपली स्नेहांकिता,
सौ. विद्या रवींद्र जोशी
अध्यक्षा, बृहन्महाराष्ट्र मंडळ, उत्तर अमेरिका