काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल

नांदतो केवळ पांडुरंग
दश इंद्रियांचा एक मेळ केला
ऐसा गोपाळकाला होत असे

मंडळी, नुकतीच आषाढी एकादशी पर पडली.नेहमीप्रमाणेच मराठी मन विठुमाऊलीच्या नाम गजरात चिंब न्हाऊन निघाले.मराठी मातीपासून शेकडो मैल दूर असलो तरी विठूनामाची ती स्पंदनं आपल्या मनापर्यंत पोचतातच आणि मग प्रत्यक्ष काया हीच जणू पंढरी आणि आत्मा हा विठ्ठल होऊन जातो.या मानसभक्तिला स्वरांच्या मध्यमातून आविष्कृत करण्याचं काम यावेळी BMM च्या ‘उत्तर अमेरिकेतील कार्यक्रम’ या उपक्रमाअंतर्गत टोरोंटो भाषिक मंडळाच्या कलाकारांनी केले.या ‘आषाढी संगीतोत्सवा’ त टोरांटो येथील तरूण नव्या दमाचे कलाकार सहभागी झाले होते. अतिशय उत्तम प्रतिसादात हा कार्यक्रम पार पडला.

अशा अनेक नवनवीन कल्पक कार्यक्रमांचे आयोजन BMM करीत असते. आता येणाऱ्या २०२२ च्या  ‘अटलांटिक सिटी’ मधील अधिवेशनात तर अशा कल्पक आणि मनोरंजक कार्यक्रमांची भरगच्च मेजवनीच आहे.जगभरातील उत्तमोत्तम मराठी कार्यक्रम इथल्या रसिकांपर्यंत पोहोचावे यासाठी कार्यक्रमाचे प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन आम्ही करीत आहोत. प्रस्ताव पाठवण्याची लिंक आहे https://bmm2022.org/submit-program-proposal/ आणि प्रस्ताव स्वीकारण्याची शेवटची तारीख आहे:  १५ ऑगस्ट २०२१.तर मंडळी, आपल्या अधिवेशनाच्या कामाची प्रगती तुम्हाला सांगायची म्हणजे व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी पॅकेजेस विकली गेली आहेत.आता ब्रॉंझ आणि सिल्वर पॅकेजेस आहेत ती खरेदी करण्यासाठी त्वरा करा.सेलिब्रिटी शेफ विष्णू मनोहारांचे खास बेत आणि अनेक उत्तमोत्तम कार्यक्रम तुमच्यासाठी सज्ज आहेत.

मंडळी,आपल्या कर्मभूमीत आपण मनापासून रुजलो आहोत. तरीही मायदेशी जाणारं एखादं पाखरू जरी  दिसलं तरी ‘देते तुझ्या सोबतीला आतुरले माझे मन

वाट दाखवाया नीट,माझी वेडी आठवण’

अशी मनाची अवस्था होऊन जाते.४ जुलै चा स्वातंत्र्योत्सव साजरा करतानाच १५ ऑगस्ट चा स्वातंत्र्यसोहोळा बघण्यासाठीही मन आतुरलेले असते.शेवटी,स्वातंत्र्य या मूल्याचा आदर करणारा जगातील प्रत्येक स्वतंत्रता दिवस चिरायू होवो हीच मनःपूर्वक शुभेच्छा!

कळावे लोभ असावा

आपली नम्र,
विद्या जोशी
अध्यक्ष्या, बृहन महाराष्ट्र मंडळ