नमस्कार मंडळी,

नुकताच `फादर्स डे’ होऊन गेला. आई बाबांसाठी काय लिहावे हे आपल्याला कधी सुचतच नाही.

‘लिहावेसे वाटते बाबा
तुमच्यासाठी खूप काही
पण आभाळ ज्याच्यात मावेल असा
शब्दच कधी सापडत नाही…..’ 

खरंच,काही नाती शब्दांपलिकडली असतात.पण या ‘डे’ संस्कृतीच्या माध्यमातून आपण ती शब्दांत मांडायला शिकलो आहोत.नात्यांचा उत्सव साजरा करायला शिकलो आहोत.`तीर्थरूप बाबा’ पासून ‘लव्ह यू बाबा’ पर्यंतचा हा प्रवास मोकळा वाटला तरी तेवढाच प्रगल्भ आहे.ही नात्यांची वीण अशीच घट्ट होत रहावी हीच होऊन गेलेल्या ‘फादर्स डे’च्या निमित्ताने पुन्हा एकदा शुभेच्छा.

त्याचप्रमाणे होऊन गेलेल्या ‘जागतिक योग दिना’च्याही सुदृढ शुभेच्छा.

या महिन्यात BMM च्या व्यासपीठावरून शिकागो येथे प्रथमच ‘सेलिब्रिटी शेफ’ विष्णु मनोहर यांच्याशी बातचित करण्याची संधी मिळाली. ‘कविता सुचावी तशा पाककृती सुचत जातात’ असं सांगणारे विष्णुजी जागतिक दर्जाचे विक्रमादित्य शेफ तर आहेतच पण त्यांचे उत्कृष्ट कवि,लेखक,सादरकर्ते आणि या सगळ्यांतही जपलेले साधेपण असे अनेक पैलू बघायला मिळाले. त्यांच्याशी केलेली बातचीत खऱ्या अर्थाने ‘मेजवानी’ च ठरली.

मंडळी, आपल्या २०२२ BMM अधिवेशनाचे लागलेले वेध आणि उत्सुकता काही मला स्वस्थ बसू देत नाहीय.अहो,आपल्या घरचंच कार्य हे; त्याची तयारी कुठपर्यंत आलीय ही वेळोवेळी बघायलाच हवे. तर तुम्हाला सांगायचे म्हणजे अधिवेशनाची तयारी अगदी जोरात सुरू आहे.लवकरच तेथील हॉटेल्सबरोबरच्या करारांवरही सह्या होतील.अशा सगळ्यांच्या सहकार्याने हे कार्य यशस्वी होणार ही खात्रीच आहे.

मंडळी,जाता जाता ज्ञानदेवांच्या या ओळी आठवताहेत –

`हे विश्वची माझे घर। ऐसि मति जयाचि स्थिर।किंबहुना चराचर। आपण जाहला।।‘

चराचर ‘मराठी’ होण्याचा तो दिवस दूर नक्कीच नाही..!

बृहन महाराष्ट्र मंडळ अध्यक्षा,
विद्या जोशी