नमस्कार मंडळी,

बीएमएम २०२२ अधिवेशनाच्या तयारीचा एक नवीन आढावा घेऊन मी पुन्हा आपल्यासमोर आलो आहे,बीएमएम अधिवेशन अवघ्या १३ महिन्यांवर येऊन ठेपले आहे आणि अधिवेशनाच्या तयारीला अधिकच वेग आला आहे.

अधिवेशनाचं आयोजन करणे म्हणजे दोन वर्ष कंपनी चालवण्या इतकेच आव्हानात्मक आहे किंवा त्याहून अधिक कठीण आहे. याचे कारण की इथे कर्मचारी नसून स्वयंसेवक असतात. स्वयंसेवक म्हणजे कसल्याही मोबदल्या ची अपेक्षा न ठेवता, एखादया कार्यासाठी अंतःप्रेरणे ने झटणारी व्यक्ती.

कोविडची स्थिती जसजशी सुधारत आहे आणि मोठ्या प्रमाणात लोक लसीकरण करीत आहेत. म्हणूनच न्यू जर्सी राज्याने व्यक्तिशः, एकत्र येण्याबाबतचे नियम शिथिल केले आहेत. या मुळे आम्हाला आमच्या स्वयंसेवकांना व्यक्तिशः एकत्र बोलवण्याची संधी मिळाली.

कामाला वेग घेताना सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागते ती म्हणजे सर्व समित्यांच्या कामातील सुसूत्रता, सुसंवाद आणि समतोल. हा सुसंवाद साधण्यासाठी १२ जून रोजी स्वयंसेवकांची सभा आयोजित करण्यात आली. जवळपास १०० कार्यकर्त्यांची ह्या सभेला उपस्थिती लाभली.

मी संयोजक या नात्यानी अधिवेशनाचा आवाका किती मोठा आहे आणि आपल्याला कधी आणि कोणत्या टप्प्यावर स्वयंसेवकांच्या मदतीची आवश्यकता असेल याचा पुढील १४ महिन्यांसाठी रोडमॅप सादर केला. प्रत्येक स्वयंसेवकांकडून काय अपेक्षित आहे ते स्पष्टपणे सांगण्यात आले. प्रत्येक स्वयंसेवकांकडून अपेक्षित असलेल्या गोष्टी म्हणजे उत्साह, आवड, वेळ आणि महत्त्वाचे म्हणजे ते करत असलेल्या कामाचा अभिमान. आपणास स्वयंसेवक म्हणून तज्ञ असण्याची गरज नाही, जर आपल्याकडे वेळ आणि आवड असेल तर तुम्ही संघासाठी योग्य आहात.

प्रत्येक समितीच्या प्रतिनिधीने आपली पूर्ण झालेली आणि नियोजित कामे सभे पुढे थोडक्यात मांडली. सुविधा समितीने अधिवेशन स्थळाची सविस्तर माहिती पुरवली. मार्केटिंग समितीने सोशल मीडियावर बीएमएम २०२२ अधिवेशनाची माहिती लोकांना पर्यंत कशी पोहचत आहे या बद्दल माहिती दिली. सर्वात महत्वाचे म्हणजे निधी उभारणीचा पहिला टप्पा यशस्वीरीत्या पार पडला आहे. अश्या सांगण्यासारख्या अनेक प्रगतीशील कामांबद्दल स्वयंसेवकांना माहिती देण्यात आली.  असा या कामाचं प्रत्यक्ष वृत्तांत ऐकून

स्वयंसेवक उत्साहित झाले आणि त्यांना अधिवेशनात हातभार लावावा अशी  प्रेरणा मिळाली, विविध समित्यांमध्ये काम करणाऱ्या स्वयंसेवकांची परिचय, विचारांची देवाणघेवाण व त्याबरोबर बटाटावडा आणि साबुदाणा किचिडी याचा अल्पोपहार, अश्या उत्साह च्या आणि खेळीमेळीच्या वातावरणात सभा पार पडली.

आपल्या सर्वाना एका गोष्टीचे कुतूहल नक्कीच असते आणि ते म्हणजे अधिवेशनाला कुठले कार्यक्रम ठरतात याचे. अर्थात कार्यक्रम ठरायला तसा बराच अवकाश आहे. सध्याची भारतातील कोविड परिस्थिती लक्षात घेता प्रोग्रामिंग प्रस्तावासाठी अंतिम मुदत १५ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. तरीसुद्धा प्रोग्रामिंग समितीला जवळपास शंभर प्रस्ताव आलेले आहेत. त्याचबरोबर, जेवणाच्या मेन्यू विषयी सगळ्यांच्या मनात उत्सुकता असते. आनंदाची बातमी म्हणजे सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांची कमिटीने भेट घेतली आणि त्यांनी आपल्या अधिवेशनासाठी सेलिब्रेटी शेफ म्हणून यायचे मान्य केले आहे.

यावरूनच अटलांटिक सिटीला होणाऱ्या या अधिवेशनासाठी किती उत्साहाचे वातावरण आहे आहे याची जाणीव होते. आम्हा न्यू जर्सीकरांना कुणी विचारले की तुमच्यातला सर्वात महत्वाचा गुण काय, तर आमचे स्वयंसेवकांचे बळ, त्यांची प्रतिभा आणि आमच्यातील एकी. सर्व स्वयंसेवकांना एक नवा हुरूप मिळाला आणि सभेहून परतताना सर्वांच्या मनात एकच सूर उमटला होता ‘एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ या संत तुकाराम महाराजांच्या सुंदर वचनाप्रमाणे आपणाकडून जे जे शक्य होईल ती ती मदत आपण केली पाहिजे.या सर्व गोष्टींच्या आधारवर, आम्ही एक संस्मरणीय अधिवेशन करण्याच्या मार्गावर आहोत याबद्दल मला पूर्णतः खात्री आहेचला तर मग पुढच्या महिन्यात पुन्हा भेटूया एका नवीन आशेने, आपल्या अधिवेशनाच्या तयारीचा एक नवीन आढावा घेऊन

Welcome to BMM 2022
प्रशांत कोल्हटकर
न्यू जर्सी २०२२ संयोजक