नमस्कार मंडळी,  

आला वसंत कवी कोकिल हाही आला 
आलापितो सुचवितो अरुणोदयाला’

मंडळी,लांबलचक अशा गारठयानंतर वसंत ऋतूचा मधुगंध आणि चैत्रपालवीची सळसळ मनांना पुन्हा उत्साहित करू लागली आहे.सृष्टीच्या ऋतुचक्राचं हे नव्याने सुरू होणं म्हणजे नववर्षारंभ अर्थात गुडीपाडवा! यावर्षीचा गुडीपाडवा उत्कर्ष, समृद्धी आणि आरोग्याचे दान घेऊन येवो ही शुभेच्छा !

सृष्टीच्या ऋतुचक्राबरोबरच आपल्या अभिनव कार्यक्रमांचे चक्रही अव्याहत सुरू आहे बरं का! नुकतेच मार्च २७ रोजी बृहन महाराष्ट्र मंडळ  च्या ‘उत्तररंग’ एक दिवसीय शिबिर पार पडले.त्यामध्ये ५०० हून अधिक लोकांची उपस्थिती होती. यामध्ये वॉटर कलर पेंटिंग, कायद्याचे बोला,मराठी सुगम संगीत असे अनेक कार्यक्रम सादर झाले. तर असे ही वेगवेगळे उपक्रम आणि नवनवीन कल्पनांमध्ये रंग भरताना जर पाठीवर कौतुकाची थाप पडली तर उत्साह द्विगुणित होतो याचा प्रत्ययही नुकताच आला.महिला दिनाचे औचित्य साधून One of the   ‘Top 20 Women of Excellence 2021’ हा बहुमान स्वीकारताना बृहन महाराष्ट्र मंडळ  ची अध्यक्षा आणि community leader  म्हणून मला खरोखरच अभिमान वाटतो आहे.

बृहन महाराष्ट्र मंडळ २०२२ च्या अधिवेशनाची तयारी जोरात सुरू आहे हे आपल्याला माहीत आहेच. आता तर अनेकांनी करोनाप्रतिबंधक लस घेतलेली असल्यामुळे या अधिवेशनाला उपस्थिती वाढणार यात शंका नाही.

खास या सोहळ्यासाठी बनवलेले अप्रतिम असे अभिमानगीत आणि “सोहळा अस्तित्त्वाचा!” हे घोषवाक्य यजमान न्यू जर्सी (अधिवेशन २०२२) ने नुकतेच प्रदर्शित केले आहे.अनेक प्रथितयश गायकांच्या आवाजातील ह्या गीताचे शब्द आणि संगीत आहे सलील कुलकर्णी यांचे. मंडळी या गाण्याची यू ट्यूब लिंक जरूर ऐका https://youtu.be/VyGCpFfNvwg

मराठी नववर्षाच्या या पर्वावर आपणही या गाण्यातील शब्दांचाच ठेका धरूया आणि गाऊया……………ध्यास मराठी…आस मराठी…श्वास मराठी रे…!!!

बृहन महाराष्ट्र मंडळ अध्यक्षा
विद्या जोशी