नमस्कार मंडळी,

बीएमएम २०२२ अधिवेशनाच्या तयारीचा एक नवीन आढावा घेऊन मी पुन्हा आपल्यासमोर आलो आहे. २०२२ हे वर्ष तुम्हा सगळ्यांना सुख-समृद्धीचे, समाधानाचे आणि आरोग्यदायी जावो अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो. नव्या वर्षाच्या आगमनाने बृहन महाराष्ट्र मंडळाच्या आगामी अधिवेशनाच्या तयारीचा वेग आणि उत्साह अधिकच जोमाने वाढला आहे.

प्रत्येक उगवते वर्ष काही नवीन आशा आणि स्वप्न घेऊन येते, त्याच बरोबर काही वेळा ते नवीन आव्हाने ही घेऊन येते जी आपल्या नियंत्रणाबाहेर असू शकतात. २०२२ हे असेच एक वर्ष आहे. आपल्याला वेळोवेळी अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो आहे.  आमची बीएमएम टीम ह्या सर्व अडचणींवर मात करून आणि सर्व अडथळे पार करून पर्यायी मार्ग शोधत आहेत.

आता ह्याचवर्षी आपलं अधिवेशन आहे, बरं का! चला, कामाचा वेग वाढवू या, अशा भावनेने कामांची ठरवलेली मुदत गाठली जात आहे. प्रत्येक समित्या आपापले टप्पे पूर्ण करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने कामे करत आहेत. समित्या आणि समित्यांचे स्वयंसेवक आमच्या विस्तारीत कुटुंबाचा एक भाग आहेत. प्रत्येक स्वयंसेवकांना त्यांची भूमिका आणि जबाबदारी याची जाणीव आहे आणि ते आपापली जबाबदारी समर्थपणे सांभाळत आहेत. प्रत्येक समितीने वेगवेगळ्या समितीशी सुसंवाद आणि समन्वय साधला आहे.  नियमितपणे होणाऱ्या आमच्या bi-weekly CFC बैठकीमधे प्रत्येकाला विविध समितीमध्ये काय काम चालले आहे हे जाणून घेण्याची उत्तम संधी असते.

अधिवेशनासाठी नोंदणीचे काम सुरू झाले आहे. हॉटेल बुकिंग, ग्रुप सीटिंग, देणगीदारांसाठी विशेष सुविधा, चाइल्ड केअर पर्याय, विशेष गरजा या सर्व गोष्टींचा विचार करण्यात येत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हील चेअर, विशेष सहाय्य या सर्व गोष्टी विचारात घेतल्या जात आहेत जेणेकरून त्यांना अधिवेशनात निवांत बसून कार्यक्रमांचा मनमुराद आनंद घेता येईल. त्यासोबतच लहान मुले असलेल्या पालकांसाठी बालसंगोपनाचा पर्याय उपलब्ध असेल, जेणेकरून पालकांना अधिवेशनातील सर्व कार्यक्रमांना उपस्थिती लावता येईल.

मुख्य अधिवेशनाच्या तिकिटांव्यतिरिक्त, मेजवानीचा कार्यक्रम (Banquet), सीएमई (CME), बिझनेस कॉन्फरन्स (Business Conference) आणि उत्तर-रंगसाठी Day 0 चे तिकीट लवकरच उपलब्ध केले जाईल. दर्जेदार करमणुकीच्या कार्यक्रमांबरोबरच मराठी माणसांची सर्वागीण उन्नती कशी होईल ह्या विचाराने हे वैविध्यपूर्ण अतिरिक्त कार्यक्रम आखण्यात आले आहे.

https://bmm2022.org/faq या संकेतस्थळाला भेट देउन सर्वजण इतर सवलतीचा जास्तच जास्त लाभ घेऊ शकतात.

मराठी रसिकांच्या मनाचा ठाव घेणारे उत्तमोत्तम कार्यक्रम आणण्यात आमची समिती अतिशय मेहनत घेत आहे. रसिकांना पसंत पडतील असे मातब्बर कलाकार तर हवेच पण त्याबरोबर नवीन कलाकारांना वाव मिळावा हे आम्ही जाणतो. भारतातील कलाकारांनी सादर केलेल्या कार्यक्रमात सर्व प्रेक्षकांना नेहमीच विशेष रुची असते. अधिवेशनासाठी नाट्य, संगीत, व्याख्यान, विनोदी कार्यक्रम इत्यादी घेऊन नामवंत आणि मान्यवर कलाकार भारतातून येणार आहेत. सध्याच्या बदलत्या visa regulations वर आमची टीम बारकाईने नजर ठेवून आहे म्हणूनच कार्यक्रम निश्चित होण्यास थोडा विलंब होत आहे. कार्यक्रम निश्चित होताच ती माहिती अधिवेशनाच्या bmm2022.org या संकेतस्थळावर आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून रसिकांपर्यंत वेळोवेळी पोचवली जाणार आहे. उत्तर अमेरिकेतील खालील मंडळाचे कार्यक्रम जाहीर झाले आहेत.

NJ न्यू जर्सी कॅम्प वळिवडे कोल्हापूर
VA व्हर्जिनिया जरीपटका
TX टेक्सास मराठी अस्तित्व
IL शिकागो ऐका रंगदेवता तुझी कहाणी
CA बे एरिया रसिकांचा हृदयस्त तारा

आम्ही जाहीर केलेल्या खालील ३ स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवण्याची मुदत वाढवण्यात आली आहे

  • नाट्यरंग (एकांकिका स्पर्धा)
  • नृत्यरंग (समूह किंवा सांघिक नृत्य स्पर्धा)
  • स्वररंग (गायन स्पर्धा)

या स्पर्धेसाठी नोंदणी करण्यास अजून उशीर झालेला नाही.  तुमची प्रतिभा अधिवेशनात पेश करण्याची नामी संधी मिळवण्यासाठी कृपया लवकरात लवकर नोंदणी करा. अधिक माहितीसाठी https://bmm2022.org/register-for-competition/ संकेतस्थळाला भेट द्या.

ह्या अधिवेशनाच्या निमित्ताने प्रकाशित होणाऱ्या स्मरणिकेसाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन देण्यासाठी सर्वांना आमंत्रित करण्यात आम्हाला आनंद होत आहे. तुमच्यातल्या दडलेल्या लेखकाला शब्दरूपाने व्यक्त होण्याची ही नामी संधी अजिबात दवडू नका. कृपया तुमचे मूळ अप्रकाशित काम जसे की लघुकथा, कविता, लेख, पाककृती, मराठी किंवा इंग्रजीत तसेच रेखाचित्रे, चित्रे, व्यंगचित्रे, फोटो इ. पाठवा. साहित्य पाठविण्याविषयीचे सर्व नियम आणि सूचनेसाठी भेट दया.  https://bmm2022.org/smaranika-bmm2022/

जशी प्रत्येक पहाट आशेचे नवे क्षितिज घेऊन येते त्याचप्रमाणे प्रत्येक महिना आपल्या बीएमएम २०२२ च्या अधिवेशनाकडच्या वाटचालीच्या प्रगतीचा पुढचा पल्ला गाठतो आणि उत्साह वाढवतो आणि त्याचा आढावा घेऊन मी परत पुढच्या महिन्यात तुमच्यासमोर येईन. चला तर मग आता तुमचा इथेच निरोप घेतो.

Welcome to BMM 2022
प्रशांत कोल्हटकर
न्यू जर्सी
बीएमएम २०२२ संयोजक