नमस्कार मंडळी,

बीएमएम २०२२ अधिवेशनाच्या तयारीचा पुढील टप्प्याचा आढावा मी पुन्हा नेहमीप्रमाणे आपल्यासमोर ठेवणार आहे. बीएमएम टीमने हाती घेतलेले बऱ्याच प्रकल्पाचे काम रीतसर चालू आहे. त्यात असंख्य स्वयंसेवकांचा अमूल्य हातभार लागत आहे.

२२ ऑक्टोबर रोजी कॉन्व्हेंशन समितीने अटलांटिक सिटी, न्यू जर्सी इथल्या सागराच्या किनाऱ्यावर वसलेल्या कॉन्व्हेंशन सेंटरला भेट दिली. स्वयंसेवकांबरोबर ऑल हॅन्ड्स बैठक यशस्वीपणे पार पडली. या बैठकीला शंभराहून अधिक उत्साही स्वयंसेवक उपस्थित होते. ज्यांनी शुक्रवारच्या कामकाजाच्या दिवशी ही २ तासाच्या ड्राईव्हचा हा प्रवास करून मीटिंग अटेंड केली त्यावरून स्वयंसेवक किती समर्पित आणि वचनबद्ध आहेत यावरून हे कळून येते.  स्वयंसेवकांना कन्व्हेन्शन सेंटर प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली आणि सेंटर मध्ये उपलब्ध करून दिलेल्या मुबलक सुविधांनी सगळेजण भारावून गेले. मला मनोमन खात्री आहे की या भेटीमुळे संघाला त्यांच्या संबंधित कामांसाठी सर्व तपशीलांचे आणि घडामोडींचे नियोजन करण्यात मोठी मदत होईल. स्वयंसेवकांच्या ह्या एकत्र दिलेल्या भेटीमुळे सर्वांचा कामाचा उत्साह द्विगुणित झाला आहे, मनोबल अजून वाढले आहे आणि पुन्हा एकदा नव्या जोमाने, सकारात्मक विचाराने पूर्ण टीम धडाक्यात पुढील कामाला लागली आहे.

सर्व वयोगटातील लोकांसाठी यथायोग्य अशी एक सर्वांगाने परिपूर्ण असलेली दर्जेदार कार्यक्रमांची रूपरेषा आखताना नेहमीच उच्च दर्जाचे नाटक, संगीत, नृत्य अश्या प्रकारच्या कार्यक्रमाचा नजराणा पेश करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. बीएमएम अधिवेशनातील कार्यक्रमांबाबत जशी तुम्हाला माहिती करून घेण्याची उत्सुकता आहे, त्याहून अधिक उत्सुकता आम्हाला ही माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याची आहे.

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आम्ही २ महत्त्वाचे कार्यक्रम संगीत सौभद्र आणि प्रशांत दामले/वर्षा उसगांवकर यांचे अनामित नाटक जाहीर केले.  येत्या काही आठवडयातच आम्ही इतर कार्यक्रमाची माहिती आमच्या सोशल मीडिया चॅनेल्सद्वारे तुमच्या पर्यंत पोहोचवू.

आम्ही खालील ३ स्पर्धा या अधिवेशनाच्या निमित्ताने आयोजित करत आहोत

  • नाट्यरंग (एकांकी स्पर्धा)
  • नृत्यरंग (समूह किंवा सांघिक नृत्य स्पर्धा)
  • स्वररंग (गायन स्पर्धा)

ह्या स्पर्धांबद्दल आणि अधिवेशनाच्या अधिक माहितीसाठी bmm2022.org या संकेतस्थळाला नक्की भेट द्यायला विसरू नका.

२० नोव्हेंबर २०२१ ह्या दिवशी फूड समितीने आयोजित केलेली पाककला स्पर्धा “स्वाद न्यू जर्सीचा” अतिशय यशस्वी झाली. ही स्पर्धा आयोजित करण्यामागे फूड समितीचे दोन महत्वाचे उद्देश होते ते म्हणजे न्यू जर्सीच्या कानाकोपऱ्यात अधिवेशनाविषयी उत्साहाचे, कुतूहलाचे वातावरण तयार करणे व न्यू जर्सीमधील सुगरणींना त्यांची पाककला पेश करणे, त्यांच्या कौशल्यगुणांना वाव देऊन त्याचे कौतुक करणे. या स्पर्धेतील विजेत्यांच्या पाककृती अधिवेशनातील मेनूमध्ये सहभागी केल्या जाणार आहेत. या स्पर्धेत ४२ स्पर्धकांनी भाग घेतला. मराठी विश्वचे कॅम्युनिटी सेंटर हे विविध प्रकारच्या स्वादिष्ट पदार्थांच्या सुवासाने भरून गेले होते. अतिशय उत्साहाने स्पर्धकांनी चविष्ट व चमचमीत पदार्थ बनवले. त्याचप्रमाणे अत्यंत नजाकतीने सजावटही केलेली होती.  न्यू जर्सीच्या अन्नपूर्णा सौ. मीनाताई देशपांडे आणि सौ. मोनाताई वासुदेव परीक्षकांची भूमिका पार पाडली. त्यांनी अत्यंत काटेकोरपणे परीक्षण करून ३ विजेते घोषित केले. नंतर सर्व स्पर्धकांनी आणलेल्या पाककृतींचा उपस्थितानी आस्वाद घेतला. ह्या स्पर्धेतून अधिवेशनातील विविध प्रकारच्या मेनूची एक झलक पाहायला मिळाली असे बऱ्याच लोकांनी नमूद केले. न्यू जर्सीकरांच्या वाढलेल्या अपेक्षांना न्याय देण्यासाठी फूड समिती पूर्णतः सज्ज आहे व झटून कामाला लागली आहे.

बीएमएम अधिवेशनासाठी नोंदणी रजिस्ट्रेशन साधारण जानेवारी २०२२ च्या मध्यात किंवा महिन्याच्या शेवटी सुरू होईल. परंतु त्याआधी, आमची डोनर्स पॅकेजेस सवलतीच्या दरात खास तुमच्यासाठी उपलब्ध आहेत, त्याचा जरूर लाभ घेऊ शकता. अधिक माहिती bmm2022.org या संकेतस्थळावर आहे.

तर मग मंडळी आता वाट पाहू नका. शुभस्य शीघ्रम……….लवकर तयारीला लागा.

ताई, माई, दादा आणि अक्का

अटलांटिक सिटी न्यू जर्सी बीएमएम २०२२ च्या अधिवेशनाला यायचा,

विचार करा पक्का.

 प्रत्येक उगवता दिवस एक नवीन आशा, एक नवीन स्वप्न घेऊन जन्माला येतो त्याचप्रमाणे प्रत्येक महिना आपल्या बीएमएम २०२२ च्या अधिवेशनाकडच्या वाटचालीचा प्रगतीचा पुढचा टप्पा गाठतो आणि त्याचा नवीन आढावा घेऊन मी परत पुढच्या महिन्यात तुमच्यासमोर येईन. चला तर मग आता तुमचा इथेच निरोप घेतो.

Welcome to BMM 2022
प्रशांत कोल्हटकर
न्यू जर्सी
बीएमएम २०२२ संयोजक