पाऊले चालती बीएमएम ची वाट

उषःकाल होता होता काळरात्र झाली
अरे, पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली ।। धृ ।।

सुरेश भटांच्या ह्याओळी ४० वर्षानंतरही, आजच्या परिस्थितीत किती सार्थक आहेत. विषम परिस्थितीतून सुद्धा मार्ग निघेल असा आशावाद निर्माण करणारे हे गीत अजरामर आहे. ह्या कवितेमागे वेगवेगळ्या प्रेरणा असल्या तरी कोविड महामारीच्या जागतिक संकटातून हळूहळू बाहेर पडत असलेल्या आपल्या सगळ्यांच्या सद्यस्थितीला समर्पक आहे. एक वर्षांपूर्वी याच सुमारास उत्तर अमेरिकेतील मराठी समुदायाला बीएमएम अधिवेशन होईल की नाही याबद्दल शंका होती. आपल्या अस्तित्वाचा जणू सोहळा साजरा करण्यासाठी कर्ताकरवीता श्री परमेश्वराच्या कृपेने आपल्याला ह्यातून तारले आणि पुन्हा एकदा आता विस्कटलेली घडी पूर्वपदावर येऊ लागली.

ह्याच सुमारास मराठी विश्व मंडळ, न्यू जर्सीकडे बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या २०२२ मध्ये होणाऱ्या अधिवेशनाच्या यजमानपदाची जबाबदारी सोपविली. तब्बल ३५ वर्षानंतर मराठी विश्वला ही संधी मिळाली आहे. ती आम्ही अत्यंत आनंदानें स्वीकारली असून बीएमएमने दाखवलेला विश्वास सार्थ करण्याच्या दृष्टीने आमची मार्गक्रमणा चालू आहे. आमच्या कार्यरथाची घौडदौड आता एका शानदार, दिमाखदार, भव्यदिव्य सोहळा पेश करण्याकडे कूच करते आहे. बीएमएम २०२२ च्या अधिवेशनाला आता १० महिन्यांपेक्षाही कमी कालावधी उरला आहे.

बीएमएम अधिवेशन म्हणजे सांस्कृतिक मेळावा. अत्यंत श्रवणीय अन दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम, सोबतीला विविध प्रांतीय खांद्यपदार्थांची, रुचकर मराठी भोजनाची मेजवानी म्हणजे जगाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या रसिकांसाठी अत्युच्य आनंदाची जणू पर्वणीच. अधिवेशनाचे स्वरूप फक्त मनोरंजन नसून, तर आपल्या मनाला आनंद देतील, आपल्या विचारांना चालना देतील, माणसांना एकमेकांशी जोडतील असा असावा. आणि हे चित्र प्रत्यक्षदर्शी साकारण्यासाठी एका उत्सवाच्या रूपात होणाऱ्या या मेळावाच्या यशाच्या मागे अनंत मदतीचे हात कार्यरत असतील. मराठी विश्व, न्यू जर्सीने गेली ४० वर्षे लक्षणीय कामगिरी केली आहे. ह्याचा दांडगा अनुभव असलेल्या कित्येक अनुभवी, जेष्ठ व्यक्तींचे आम्हाला अत्यंत मोलाचे मार्गदर्शन आणि त्यांचा सल्ला सातत्याने लाभत आहे. त्यांचा प्रेमळ आशीर्वाद आणि सदिच्छा अश्याच पुढे आमच्या सोबत असणार आहेत.

एक वर्षांपूर्वी मराठी विश्वाने ही धुरा समर्थपणे पेलण्याचे शिवधनुष्य उचलले आणि बीएमएम २०२२ च्या ह्या अधिवेशनासाठीच्या तयारीचा भाग म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रातल्या निपुण लोकांकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवून मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या समित्यांनी आणि उपसमित्यांनी आकार घेतला. माझ्याकडे ह्या अधिवेशनाचे मुख्य संयोजक म्हणून कार्यभार सोपवण्यात आला. श्री. अमर उऱ्हेकर आणि सौ. पुनीत मराठे यांनी सह-संयोजक म्हणून जबाबदारी स्वीकारली. ते माझ्याबरोबर प्रायोजकांशी वाटाघाटी करण्यास मदत करत आहे व त्याबरोबरच विविध कराराचा आढावा घेण्यासाठी आणि मौल्यवान अभिप्राय देण्यात त्यांची महत्वाची भूमिका असते.

अधिवेशनाचा सर्वात महत्वाचा घटक म्हणजे कॉन्व्हेंशन सेंटर. अत्यंत प्रतिकूल आणि कठीण परिस्थितीतही, न्यू जर्सीच्या टीमने गेल्या वर्षभरात बऱ्याच अडचणींचा सामना करून बऱ्याच वेळा अधिवेशन केंद्रास भेट दिली. सुविधा व्यवस्थापन प्रमुख श्री. अमोल पुरव यांच्या सर्जनशील नेतृत्वात टीमने उत्तम सुविधेसाठी उत्कृष्ट नियोजन व मांडणी केली आहे. सुविधा लॉजिस्टिक्सच्या समन्वयावर श्री. सचिन अडबे आणि श्री. देवदत्त देसाई काम करत आहेत.

अधिवेशनातील महत्वाची व सर्वांच्या आवडीची, जिव्हाळ्याची गोष्ट म्हणजे जेवण. ह्या सुग्रास, स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण जेवणाचा आस्वाद घेणे आणि तोसुद्धा आप्तेष्ट, परिवार आणि मित्रमंडळींच्या सोबतीने, अशी संधी कोण दवडणार? उत्तम जेवणाच्या जोडीला मग मनसोक्त गप्पा पण मारता येतात. अश्या भोजनतृप्तीसाठी आमच्या फूड समितीच्या प्रमुख सौ. पूजा शिरोडकर व सह-प्रमुख सौ. रूपाली घोडेकर आणि त्यांची टीम सज्ज झाली आहे आणि यांच्या जोडीला खुद्द सेलिब्रिटी शेफ श्री विष्णू मनोहर वैयक्तिकरित्या उपस्थित असतील. सौ. मीना देशपांडे आणि सौ. मोना वासुदेव यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन फूड समितीला सातत्याने लाभले आहे. शिवाय हे चवदार गरम गरम जेवण तुमच्या पानात कसे पडेल याची दक्षता आपल्या फूड लॉजिस्टिक प्रमुख सौ. स्नेहल वझे व सह-प्रमुख सौ. गायत्री कुलकर्णी आणि सौ. नीता देवळाणकर आणि त्यांची टीम घेतील.

उत्तम भोजनाच्या जोडीला उत्तरोत्तर रंगत जाणारे, मनाला आनंद देणारे करमणुकीचे दर्जेदार कार्यक्रम हा सुद्धा अधिवेशनाचा महत्वाचा भाग आहे. अधिवेशनात आयोजित होणाऱ्या कार्यक्रमांसाठी आमच्या प्रोग्रामिंग टीमला विविध कार्यक्रमांसाठी विक्रमी २३५ प्रस्ताव प्राप्त झाले. संपूर्ण उत्तर अमेरिकेत आम्हाला लक्षणीय प्रतिसाद मिळाला. भारतातून आम्हाला केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर गोवा, छत्तीसगड आणि अगदी राजस्थान मधूनही प्रस्ताव आले आहेत. आपल्या मराठी समुदायामध्ये अधिवेशनासाठी एक अभूतपूर्व उत्साहाचा, जल्लोषाचा सकारात्मक वारा वाहतो आहे हेच ह्या जगभरातून आलेल्या प्रतिसादातून दर्शविते. एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या कार्यक्रमांमधून केवळ २५-३० उत्तम कार्यक्रम निवडणे हे प्रोग्रामिंग प्रमुख श्री संदीप धरम आणि निवडसमितीमधले त्यांचे इतर सहकारी यांच्यासमोर मोठे आव्हान होते. हे आव्हान यशस्वीरीत्या पार करून प्रोग्रामिंग टीम तुमच्या सर्वांसमोर दर्जेदार कार्यक्रमाचा नजराणा पेश करण्यासाठी कार्यरत आहे. आपणां सर्वांसाठी विविधरंगी कार्यक्रमाची रूपरेषा आम्ही ठरवली आहे आणि येत्या काही आठवडयातच आम्ही कार्यक्रमाची माहिती आमच्या सोशल मीडिया चॅनेल्सद्वारे तुमच्या पर्यंत पोहोचवू.

कोणताही कार्यक्रम उच्च दर्जाचा होण्यासाठी, ध्वनी आणि प्रकाश समन्वय, नाटक किंवा मैफिलीच्या यशात अत्यंत मोलाची भूमिका बजावतात. ध्वनी आणि प्रकाशाची जबाबदारी श्री. विकास फाटक आणि श्री. प्रफुल्ल मेस्त्री हे समर्थपणे पेलत आहेत.

कार्यक्रमांव्यतिरिक्त आम्हाला नृत्य, संगीत आणि एकांकिका क्षेत्रात नवोदित कलागुणांना व्यासपीठ द्यायचे आहे. यासाठी आम्ही विविध स्पर्धा आयोजित करत आहोत. या सर्व स्पर्धा किंवा प्रदर्शनाच्या प्राथमिक फेऱ्या ऑनलाईन फोटो/विडिओ सबमिशनद्वारे घेतल्या जातील. त्यामुळे जास्तीत जास्ती व्यक्तींना या स्पर्धांमध्ये भाग घेता येईल. नाट्य रंग स्पर्धेचे व्यवस्थापन आणि समन्वय श्री. मनोज शहाणे आणि श्री. आशुतोष हडप करत आहेत. स्वर-रंग स्पर्धेचे सूर ताल सौ. वैशाली पाटणकर आणि सौ. अर्चना नाडकर्णी बसवत आहे तर सौ. दीपा लिमये आणि श्रुती देशपांडे नृत्य-रंग स्पर्धाचे डान् स्टेप्सच्या बारकाव्यांकडे लक्ष पुरवत आहेत. या बद्दल अधिक माहितीसाठी bmm2022.org या संकेतस्थळाला भेट द्या
अधिवेशनाचा अतिशय महत्वाचा भाग म्हणजे उद्घाटन सोहळा, जो स्थानिक कलाकारांच्या प्रतिभेद्वारे सादर केला जातो आणि यजमान मंडळासाठी आपली पहिली छाप निर्माण करण्याची आणि संमेलनासाठी पुढील ३ दिवसांच्या कार्यक्रमाविषयी प्रेक्षकांच्या मनातील अपेक्षा उंचावण्याची संधी असते. उद्घाटन सोहळयाची जबाबदारी न्यू जर्सीतील थिएट्रिक्स या संस्थेने घेतली आहे. सौ. शुभदा कामेरकर, सौ. अनु महाशब्दे, सौ सुनीता पाठक, श्री. राजीव भालेराव आणि श्री. मकरंद भावे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या सक्षम खांद्यावर ही जबाबदारी आहे.

कार्यक्रम आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थांसह, उपस्थितांना विशेषकरून महिलावर्गाला अधिवेशनात खरेदीचाही मनमुराद आनंद लूटता यावा ह्यासाठी विक्रेता आणि स्टॉल मिळवण्याची जबाबदारी वेंडर मॅनेजमेंट प्रमुख श्री. राहुल पवार आणि सह-प्रमुख श्री. सुधीर बने सांभाळत आहेत.

लक्ष्यवेधी सजावट हा कोणत्याही कार्यक्रमातील अत्यंत महत्वाचा भाग आहे. आमच्या अधिवेशनाची संकल्पना उपस्थितांपर्यंत पोहोचवण्याची तसेच त्यांचा उत्साह वाढवण्याची जबाबदारी सजावट समिती प्रमुख सौ. गौरी चौधरी व सौ. वैशाली भिडे आणि त्यांच्या समितीने घेतली आहे

अधिवेशनाला उपस्थित असलेल्या प्रत्येकाला खूप विशेष वाटावे आणि हे त्यांचे स्वतःचे अधिवेशन आहे असे वाटावे त्याचबरोबर काही अविस्मरणीय आठवणींची शिदोरी बांधून त्यांची पाठवणी करावी. ही आमची स्वप्नपूर्ती सफल होण्यासाठी, आमचा निश्चय पूर्णत्वाला नेण्यासाठी सौ. अश्विनी कुरे, सौ. सुजाता बागडे आणि सौ. शलाका सावंत ह्यांचा सहभाग असलेली यजमान आणि आतिथ्य समिती जय्यत तयारीनिशी कामाला लागली आहेत.

उपस्थितांसाठी आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे हॉटेल मुक्कामाची उत्तम सोय, जे कन्व्हेन्शन सेंटर पासून जवळ आणि वाजवी किंमतीत उपलब्ध असावे. इतर गोष्टींप्रमाणे हे लक्ष्यसुद्धा पार पाडण्यासाठी आमच्या हॉटेल आणि ट्रान्सपोर्टेशन विभागसमितीचे प्रमुख श्री. अनिरुद्ध निवर्गी व सह-प्रमुख श्री. योगेश वाळके यांच्या अथक प्रयत्नांमुळे आम्ही यशस्वीरीत्या शेरेटन हॉटेलसह सीझर, ट्रॉपिकाना आणि हॅरॅश सारख्या कॅसिनोसह २००० खोल्यांसाठी करार पूर्ण केला आहे.

अधिवेशन आगळे वेगळे करण्यासाठी काही नवीन उपक्रम हाती घेण्यात आले आहे. हे अधिवेशन काही प्रमाणात/बाबतीत “Go Green” असावे असे आमच्या समितीचे ठाम मत आहे. श्री. निरंजन देव, श्री. मकरंद देवधर आणि गो ग्रीन तज्ञ सौ. दर्शना गुप्ते यांनी या संदर्भांत पुढाकार घेतला आहे.

दुसरा महत्त्वाचा उपक्रम म्हणजे ‘एज्युकेशन समिट’ जो आपल्या विद्यार्थ्यांना भारत आणि उत्तर अमेरिकेतील विद्यापीठाशी जोडणारा महत्वाचा दुवा ठरेल. यात आम्हाला श्री. मुकुंद चोरघडे आणि श्री. मुकुंद कर्वे मोलाचे मार्गदर्शन करीत आहे.

आम्हाला आशा आहे की अधिवेशनाची हि रूपरेषा बघून बरेच मराठी तरुण ह्याकडे आकर्षित होतील आणि त्यांना भारतीय आणि पाश्चात्य संस्कृतीचा समतोल अनुभवायला मिळेल. हे अधिवेशन आजच्या युवा पिढीसाठी अविस्मरणीय असावे यासाठी युवा समितीच्या प्रमुख सौ. नीलम साळवी काम करीत आहेत आणि तेजल कुरे, ओम सावरगावकर सारखे उत्साही तरुण मदत करत आहेत.

आमच्या सह-संयोजिका सौ. पुनीत मराठे यांनी ‘Day 0’ कार्यक्रमांच्या नियोजनाची जबाबदारी स्वीकारली आहे. दर अधिवेशनासारखे ‘Day 0’ मध्ये CME, उत्तरंग आणि बिझनेस कॉन्फरेन्सचा समावेश असेल. व्यापार परिषेदला या अधिवेशनात आपण विशेष स्थान देऊया. बिझनेस कॉन्फरेन्स सगळ्यांसाठी करायचा आपण प्रयत्न करू. त्यासाठी “skills building, networking opportunities, career guidance opportunities, leadership coaching अशा गोष्टींचा समावेश करून मराठी माणसांना एकमेकांशी जोडायचा आपला प्रयत्न असेल. बिझनेस कॉन्फरन्सचे नेतृत्व श्री. आनंद चौथाई करतील. “CME” चे आयोजन प्रमुख डॉ. दीप्ती उतरणकर, सह-प्रमुख डॉ. अमेय पाटील आणि डॉ. संदीपा उत्पात करत आहेत, तर उत्तरंगचे नेतृत्व श्री नंदा पडते, श्री. जगदीश वासुदेव आणि क्लब ५५ चे अनुभवी मंडळी करत आहे. सर्वात महत्वाचा कार्यक्रम ज्यासाठी रसिक मंडळींना नेहमीच उत्सुकता असते ती म्हणजे संध्याकाळचे मेजवानीचे जेवण. ह्या भोजनाच्या यजमानपदाची जबाबदारी बँक्वेट कमिटी प्रमुख सौ. ज्ञानदा भिडे व सह-प्रमुख सौ. उमा पुरंदरे ह्यांनी घेतली आहे.

वेबसाइट आणि वेगवेगळे सोशल मीडिया हॅन्डल्सद्वारे जगभरातल्या लोकांपर्यंत बीएमएम २०२२ अधिवेशनाची माहिती पोहोचवण्याचे महत्वाचे काम केले जात आहे. मार्केटिंग आणि मीडिया प्रमुख म्हणून श्री. राज पोफळे व त्यांच्याबरोबर सौ. तेजू बांबूळकर आणि सौ. राजश्री कुलकर्णी ह्या त्यांना सहकार्य करतील. श्री. सुभाष लिमये आम्हाला मार्केटिंग साठी सुंदर आणि प्रभावी फ्लायर्स बनवण्यात मदत करत आहेत

बीएमएम २०२२ च्या अधिवेशनाची कार्यकारिणी, त्यातले सदस्य, इथे होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा, जाहिराती आणि ह्याच्याशी निगडित इतर बऱ्याच गोष्टीचा समावेश असणारी स्मरणिका रसिक प्रेक्षकांना अर्पित करण्यात येईल. जेणेकरून उपिस्थत रसिकांच्या मनात हे अधिवेशन शब्दरूपात नेहमीच मनाच्या कप्प्यात राहील. हि स्मरणिका सौ. छाया अरणके , सौ. नीता नाबर, सौ. शुभदा सावरगावकर, सौ.प्रिया गोडबोले आणि सौ. नीता पुरव त्यांच्या प्रयत्नाने पुस्तकरूपात साकारेल.

अधिवेशनाचे यशस्वी चित्र प्रत्यक्षात उतरण्यासाठी हमी द्यावी लागते हजारोंच्या आकड्यात आणि खर्च होतो लाखोंचा घरात. अर्थातच देणग्यांच्या स्वरूपात गंगाजळी जमवावी लागते. प्रत्येक यजमान मंडळ खर्च नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतात. परंतु उच्च दर्जा टिकविण्यासाठी खर्च हा काही वेळा, काही ठिकाणी टाळता येत नाही. आजची वस्तुस्तिथी अशी आहे की देणगीदारांच्या पाठिंब्याशिवाय अधिवेशन आयोजित करणे अशक्य आहे. आणि मग संभाव्य देणगीदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रवास सुरू होतो. मला हे सांगताना आनंद होत आहे की आम्हाला उत्तर अमेरिका आणि भारतभरातील मराठी समुदायाकडून जबरदस्त पाठिंबा मिळाला आहे, ज्यामुळे आम्हाला आमच्या निधी उभारणीचे लक्ष्य वेळेपूर्वीच पूर्ण करण्यात मदत झाली आहे आणि मला विश्वास आहे की आम्ही आमचे पुढील निधी उभारणीचे लक्ष्य टप्प्या टप्प्याने वेळेपूर्वीच पूर्ण करू शकू. यासाठी मी आणि निधी उभारणीचे प्रमुख श्री. विलास सावरगावकर व सह-प्रमुख सौ. हेमल ढवळीकर संभाव्य वैयक्तिक देणगीदार आणि कॉर्पोरेट प्रायोजकांपर्यंत पोहोचत आहोत.

विविध प्रवाहांमधील बजेट व्यवस्थापित करणे आणि सर्व प्रवाहांसाठी उच्च दर्जाचे प्रमाण राखून ठेवणे आणि बजेट नियंत्रणात ठेवणे हे सुनिश्चित करणे हे सर्वात महत्त्वाचे काम आहे. ह्या बजेटचा ताळमेळ साधण्याची भूमिका कोषाध्यक्ष श्री. विहार देशपांडे निभावतील.

आर्थिक सामर्थ्याबरोबरच, कोणतेही अधिवेशन यशस्वी होण्यासाठी स्वयंसेवकांच्या ताफ्याची गरज असते.
आम्हा न्यू जर्सीकरांना कुणी विचारले की तुमच्यातला सर्वात महत्वाचा गुण काय तर आमचे स्वयंसेवकांचे बळ, अविरत उत्साह, कौशल्य आणि आमच्यातील एकी. सर्व स्वयंसेवकांमध्ये सर्व कामांचा समन्वय कोणत्याही अधिवेशनाच्या यशासाठी लक्षवेधी ठरतो. हे समन्वय स्वयंसेवक समितीच्या प्रमुख सौ. रत्ना आगरकर आणि सह प्रमुख सौ. दीप्ती कारखानीस यांच्याकडून केले जात आहे.

प्रकल्प व्यवस्थापक श्री. मुकुल डाकवाले सर्व समित्यांमध्ये समन्वय साधण्यास आणि सर्व समित्यांसाठी रोडमॅपची योजना आखण्यात मदत करीत आहेत.

मला सांगताना फार अभिमान वाटतो की मराठी विश्व टीम आणि बीएमएम टीम मध्ये एक अद्वितीय संतुलन आणि समन्वय स्थापित झाला आहे. त्या बरोबर आमच्या समितीला सतत पाठिंबा, मार्गदर्शन व मौल्यवान माहिती प्रदान केल्याबद्दल मी बीएमएमच्या अध्यक्षा सौ. विद्या जोशी आणि बीएमएम टीम चे सौ. सोना भिडे, सौ. कोमल चौक्कर, सौ. हेमा राचमाळे, श्री. मोहित चिटणीस व इतर सदस्य यांचे मनापासून आभार मानू इच्छितो.

वरील विविध समित्यांचा आणि त्यांच्या कार्याची ओळख करून देताना केवळ नकळत कुणाचे नाव नमूद करायचे राहून गेले असल्यास आमच्याकडून क्षमस्व.

हे कार्य सिद्धीस नेण्यास मी व माझी टीम बांधील आहोत आणि ते आम्ही समर्थपणे पार पडूच अशी खात्री बाळगून आहोत. आम्हाला मराठी विश्व बोर्ड आणि मराठी विश्व अध्यक्ष श्री. अतुल आठवले यांचे पूर्ण समर्थन आहे आणि त्याबरोबर न्यू जर्सी मधील सर्व मराठी समुदाय भक्कमपणे आमच्या पाठीशी उभा आहे आणि त्यांचा आशीर्वाद आमच्या बरोबर आहे. ह्यानुसार आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि कृपाछत्राने आम्ही आगामी अधिवेशनाच्या यशाचा कळस नक्कीच गाठू ह्यात कुठलाही संदेह नाही.

‘सोहळा अस्तित्वाचा” ह्या संकल्पनेच्या धर्तीवर मराठी विश्व तुमच्या सर्वांचे बीएमएम २०२२ मधे दिलखुलास स्वागत करण्यासाठी सज्ज असेल. चला तर मग तुम्ही आम्ही मिळून रचू एक नवा इतिहास आणि होऊ एका ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार.
पाऊले चालती बीएमएम ची वाट
उत्साह मनोमनी दाटला अफाट
नक्की यायचे ह्या अधिवेशनाला
पाहतो तुम्हा रसिकांची वाट…..

Welcome to बीएमएम २०२२
प्रशांत कोल्हटकर
मराठी विश्व न्यू जर्सी – बीएमएम २०२२ संयोजक