नमस्कार मंडळी, 

गेल्या कित्येक महिन्यांपासून आपण एक स्वप्न घेऊन चाललो आहोत.२०२२ च्या बृ.म.मं.च्या अधिवेशनाचं.तेव्हापासून मनातली प्रत्येक वाट  स्वप्नामधील गावा अर्थातच अटलांटिक सिटीकडेच धाव घेत असते.स्वप्नातली ही भरारी प्रत्यक्षा त.आणण्यासाठी वास्तवाचं भान असणारं सशक्त नियोजन हवे.यजमान न्यू जर्सीच्या कार्यकर्त्यांच्या रूपात आपल्याला ते लाभले आहे याची जाणीव नुकत्याच अधिवेशन स्थळाला दिलेल्या भेटीत झाली.२२ आणि २३ ऑक्टोबरच्यरोजी झालेल्या मन आश्वस्त करणा-या या भेटीचा वृत्तांत तुम्हालाही सांगायला मला नक्कीच आवडेल

शुक्रवारपासूनच आमच्या भेटीगाठींना सुरूवात झाली.अधिवेशनाच्या सगळ्या समित्यांचे पदाधिकारी आणि शंभराहून अधिक स्वयंसेवक( व्हॉलेंटीयर्स)  BMM टीम ला भेटायला आपापल्या कामातून वेळात वेळ काढून आले.दुपारच्या मस्त जेवणानंतर कन्व्हेंशन सेंटच्या टूरला आम्ही निघालो.तीन मजली भव्यदिव्य इमारत,२५-३० खोल्या आणि एकाचवेळी६००० लोक मावतील एवढी व्याप्ती असलेलं हे कन्व्हेन्शन सेंटर आणि तितकेच उत्साही आणि अगत्यशील असे आपले यजमान.अगदी सभागृहात खुर्च्या कशा मांडाव्या,कोणता कार्यक्रम कुठे घ्यावा इथपासून तर जेवणाची ताटे, टेबल त्यातलं अंतर,रांगेत लागणारा वेळ अशा सगळ्या गोष्टींचा अतिशय बारकाईने विचार करून त्यानुसार नियोजन  करण्याने  आयोजकांचे कौशल्य अगदी थक्क करणारे आहे.स्वागत,सजावट,भोजन, ध्वनीव्यवस्था,आर्थिक आघाडी…..अशा वेगवेगळ्या समितींनी आपापसात योग्य समन्वय साधत बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा केली.निर्णय घेतले.जवळजवळ ६ तास ही बैठक चालली.

न्यू जर्सीचे आदरातिथ्य तर अगदी विचारून नका! पदोपदी आम्ही त्याचा अनुभव घेत होतो.दिवसभराच्या बैठकीनंतर मुख्य समितीच्या सदस्यांबरोबर  (CSC टीम) रात्रीच्या जेवणाचा आस्वाद घेत घेत अधिवेशनाच्या गप्पा रंगत गेल्या.

कुठलाही कार्यक्रम म्हटला म्हणजे भोजनव्यवस्था ही उत्कृष्ट असायलाच हवी.आपल्या संस्कृतीची ती विशेष ओळख आहे.शनिवारी सकाळी सचिन मोदी यांच्या’राजभोग’ ला भेट देऊन तीही व्यवस्था आम्हाला बघता आली.मुख्य म्हणजे अधिवेशन काळात जेथे आपले जेवण तयार होणार आहे त्या फॅक्टरीचीही सैर त्यांनी आम्हाला घडवून आणली.तिथली स्वच्छता आणि निरोगी वातावरण पाहून खरोखरीच मन अगदी निःशंक झालं.

मनाच्या समाधानात आणि आनंदात अधिकच भर घातली ती ‘नाट्यदर्पण’च्या नाटकांनी.अशोक चौधरींच्या या संस्थेची वेगवेगळ्या भाषेतील नाटकं बघायला मिळणे ही एक पर्वणीच! त्यानंतर त्यांच्या घरी BMM च्या कामाचं नाट्यदर्पण तर्फे झालेलं कौतुक आणि पारितोषिक आमचा उत्साह वाढणारं होतं. थिएट्रीक चे मनोज शहाणे यांच्याकडे आमच्यासाठी आयोजित केलेल्या छोटेखानी स्वागतसोहळ्यात अनेक सुंदर ओळखी झाल्या.नेहमीसाठी काही मैत्र जोडले गेले त्याचबरोबर अधिवेशनात होऊ घातलेल्या भव्यदिव्य सादरीकरणावर  चर्चा झाली.एका भव्यदिव्य आयोजनाचे आपण साक्ष ीदार ठरणार आहोत या जाणिवेनेच जणू रोमांच उभे राहीले.

शेवटी तिथून परतण्याचा दिवस रविवार उजाडला.प्रशांत कोलटकरांचे नेहमीप्रमाणेच प्रेमळ अगत्य नेहमीच पुन्हापुन्हा यायला भाग पाडतं.BCC आणि BMM टीमच्या प्रत्यक्षात झालेल्या चर्चा,योजना,सूचना अधिवेशनाच्या यशस्वीतेत भर घालणाऱ्याच ठरतील.

खरंच, अडीच दिवसांच्या या अधिवेशनासाठी महिनोंमहिन्यांपासून घालणारे हे नियोजन,भेटीगाठी,कष्ट यातून नेमकं मिळतं काय… तर जन्मभर पुरणारी ही नाती.नकळत बांधले जाणारे हे बंध म्हणजे  आयुष्याचं सर्वात मोठं संचित आहे.

अरे हो, जाताजाता स्नेहल ढवळीकरची तिच्या दुकानात झालेली भेट आणि तिने आपुलकीने प्रवासासाठी  बांधून दिलेल्या खाद्यपदार्थांची चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे…आणि मनात कन्व्हेंशनच्या निमित्ताने पुन्हा सर्वांना भेटण्याची आतुरता!

तर भेटूया लवकरच

कळावें, लोभ असावा.

आपली स्नेहांकिता,
सौ. विद्या रवींद्र जोशी
अध्यक्षा, बृहन्महाराष्ट्र मंडळ, उत्तर अमेरिका