नमस्कार मंडळी,

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ

निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा

मांगल्याचे प्रतीक आणि कार्य सिद्धीस नेणाऱ्या अश्या या मंगलमूर्तीला वंदन करून बीएमएम २०२२ अधिवेशनाच्या तयारीचा एक नवीन आढावा घेऊन मी पुन्हा आपल्यासमोर आलो आहे.

गणपती हे महाराष्ट्राचे प्रिय आराध्यदैवत आहे. आपले इच्छित कार्य सफल व्हावे यासाठी सर्वप्रथम गणपतीचे पूजन करून त्याचे शुभाशीर्वाद घेतले जातात. नुकताच संपन्न झालेला गणेशोत्सव, बऱ्याच मराठी मंडळांनी तो आभासी (virtual) साजरा केला तर काही मंडळांना वैयक्तिकरित्या साजरा करण्याची संधी मिळाली. भव्य डेकोरेशन, ढोल ताशा, आरास स्पर्धा इत्यादी कार्यक्रम सर्व CDC COVID प्रोटोकॉल पाळून जवळपास सर्व मंडळांनी गणेशोत्सव दिमाखात साजरा केला. गणेशोत्सव म्हणजे नुसती साग्रसंगीत पूजा आणि ढोल-ताशा यांचा गजर असे नव्हे, तर आपण आपल्या चेतनेतील श्री गणेशाची प्रार्थना करतो की त्याने आपल्यासमोर मूर्तीच्या रूपात यावे जेणे करुन आपण काही काळ त्याच्याशी रममाण होऊ शकू, हसत खेळत संवाद साधू शकू.

बाप्पाच्या आशीर्वादाने गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर प्लॅनेट मराठी सोबत Title Sponsor म्हणून करार केल्याची घोषणा करताना मला अतिशय आनंद होत आहे. यासह, आम्ही इतर २ प्रायोजकांशी करार पूर्ण करण्यात यशस्वी झालो आहे. मांडके ब्रदर्स  बीएमएम २०२२  साठी गो ग्रीन प्रायोजक (Go Green Sponsor)असतील तर A S Agri and Aqua LLP रजत प्रायोजक (Silver Sponsor) असतील.

बाप्पाच्या सहवासातील हे दिवस कसे जादूमय झालेत. सगळीकडे प्रचंड उत्साह आणि धम्माल. आम्हीसुद्धा आपल्या लाडक्या बाप्पाकडे साकडं घातलंय  बीएमएम २०२२ च्या तयारीच्या यशस्वी वाटचालीसाठी.  बीएमएम आणि मराठी विश्व, न्यू जर्सी  टीमने थीम गाण्याचा नवीन व्हिडिओ लाँच केला आहे.

बीएमएम टीम ने हातही घेतलेले बऱ्याच प्रकल्पाचे काम रीतसर चालू आहे. त्यात असंख्य स्वयंसेवकांचा हातभार आहे. सर्वां बरोबर एकजुटीने व सामंजस्याने काम करण्यात जी मजा येते किंवा समाधान मिळते ते  एक स्वयंसेवकच सांगू शकेल. मला नेहमीच विविध क्षेत्रातील सर्वोत्तम लोकांना भेटण्याची संधी मिळत असते. त्यांची प्रतिभा, बांधिलकी आणि त्यांची काम करण्याची वृत्ती मला नेहमीच प्रेरणा देऊन जाते आणि बरंच काही शिकता येते.

अधिवेशन आगळे वेगळे करण्यासाठी काही नवीन उपक्रम हाती घेण्यात आले आहे. त्यापैकी एक उपक्रम म्हणजे ‘एज्युकेशन समिट’ जो आपल्या विद्यार्थ्यांना भारत आणि उत्तर अमेरिकेतील विद्यापीठाशी जोडणारा महत्वाचा दुवा ठरेल. बीएमएम व्यासपीठाचा भारतातील आणि अमेरिकेतील युवक-युवतींना दूरगामी फायदा व्हावा यासाठी भारतातील विद्यापीठे आणि उत्तर अमेरिकेतील विद्यापीठे यांच्यात शिक्षणाच्या सर्व आघाड्यांवर आणि त्यातील विविध घटकांमध्ये कशी  लक्षणीय प्रगती करावी यावर संभाषण आणि चर्चा आयोजित केली जाईल. अनेक विद्यापीठांनी या उपक्रमात सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. यात आम्हाला श्री. मुकुंद चोरघडे आणि श्री. मुकुंद कर्वे मोलाचे मार्गदर्शन करीत आहे.

तसे बरेच काही करायचा बेत आहे, अनेक चुलींवर बरेच काही शिजत आले आहे, पण तरी पानात पडण्यास आणि त्याचा आस्वाद घेण्यास अजून थोडा वेळ लागेल, अशी परिस्थिती आहे.

बीएमएम अधिवेशनातील कार्यक्रमांबाबत जशी तुम्हाला माहिती करून घेण्याची उत्सुकता आहे, त्याहून अधिक उत्सुकता आम्हाला ही माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याची आहे. येत्या काही आठवडयातच आम्ही कार्यक्रमाची माहिती आमच्या सोशल मीडिया चॅनेल्सद्वारे तुमच्या पर्यंत पोहोचवू.

आम्ही खालील ३ स्पर्धा या अधिवेशनाच्या निमित्ताने आयोजित करत आहोत

  1. नाट्यरंग (एकांकी स्पर्धा)
  2. नृत्यरंग (समूह किंवा सांघिक नृत्य स्पर्धा)
  3. स्वररंग (गायन स्पर्धा)

या बद्दल आणि अधिवेशनाच्या अधिक माहितीसाठी bmm2022.org या संकेतस्थळाला भेट द्या

प्रत्येक उगवता दिवस एक नवीन आशा, एक नवीन स्वप्न घेऊन जन्माला येतो त्याचप्रमाणे प्रत्येक महिना आपल्या बीएमएम २०२२ च्या अधिवेशनाकडच्या वाटचालीचा प्रगतीचा पुढचा टप्पा गाठतो आणि त्याचा नवीन आढावा घेऊन मी परत पुढच्या महिन्यात तुमच्यासमोर येईन. चला तर मग आता तुमचा इथेच निरोप घेतो.

Welcome to BMM 2022

प्रशांत कोल्हटकर

न्यू जर्सी

बीएमएम २०२२ संयोजक