October update from Vidya Joshi

October update from Vidya Joshiनमस्कार मंडळी, 

श्रावण संपत आला की आपसूकच मन गणरायाच्या आगमनाची वाट बघायला लागतं.मनातल्या मनात आपली आरास करून झाली 

असते.अजून बाजारातही न आलेली गणेशाची मूर्ती आपल्या मनातल्या देखाव्यात स्थानापन्न झालेली असते. 

नैवेद्याच्या फर्माईशी तर घरातून आधीच सुरू झालेल्या असतात. गणपतीचे आगमन होणार या नुसत्या कल्पनेनेच 

मनाचा कोपरान् कोपरा उजळलेला असतो. यंदाच्या गणेशोत्सवाची सुरूवातही नेहमीप्रमाणे अशीच मनापासून झाली आणि बघता बघता गणरायाने आपला निरोप घेतलासुद्धा आणि जाताजाता वर्षभराची ऊर्जा देऊन गेला. 

या गणेशोत्सवाच्या निमित्ताने सगळ्या मराठी मंडळांना छायाचित्रे पाठवायला सांगितली त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.एकमेकांपासून कित्येक मैल दूर असलेल्या मनांना एकत्र आणण्याची गणेशोत्सवामागील टिळकांची  संकल्पना अशा रितीने अजूनही यशस्वी होते आहे. 

मंडळी,खरं तर भारतीय संस्कृतीमध्ये सणावारांचे प्रयोजन मनाला सतत उत्साही ठेवणे आणि मनावर नैराश्याची काजळी चढू न देणे हेच असावे. परंतु हा झाला आपला पारंपरिक मार्ग. पण म्हणतात ना ‘व्यक्ति तितक्या प्रकृती’ या म्हणीप्रमाणे  आजकाल बदलत्या जगात मानसिक स्वास्थ्य जपण्याची प्रत्येकाची गरज वेगळी आहे 

आता आपला आवडता विषय म्हणजे होणाऱ्या अधिवेशनची तयारी. अधिवेशनाच्या चाललेल्या त्यारीच्या बातम्या ऐकायला तुम्हीही उत्सुक असता. तर आनंदाची बातमी म्हणजे अधिवेशनाला Planet M चे प्रायोजकत्व मिळाले आहे.कोविड काळात मिळालेल्या या पाठिंब्यामुळे आमचा उत्साह द्विगुणित झाला आहे. 

मंडळी, या महिन्यातल्या उत्साही बातम्यांना एक दुःखाची किनारही आहे.ती म्हणजे अशोक सप्रे यांच्या निधनाची. 

अमेरिकेतील विशेषतः लॉस एंजेलीस मधील मराठी बांधवांसाठी केलेल्या कामासाठी अशोकजी नेहमीच स्मरणात राहतील.त्याचप्रमाणे बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या वतीने उत्तर अमेरिकेतील सर्वच मराठी आणि भारतीय समाजासाठी उत्तररंग म्हणजे आयुष्याचा उत्तरार्ध सत्कारणी कसा घालवावा यासाठी सभा, परिषदा आणि मेळावे घेऊन भारतीय समाजात आपल्या निवृत्तीनंतरच्या प्रश्नांबद्दल जागृती निर्माण केली. मराठी अधिवेशनात उत्तररंग विषयक एक दिवसाची परिषद घेण्याची प्रथा अशोक सप्रे यांनी सुरु केली.  त्यांचे सामाजिक कार्य, दिलखुलास व्यक्तिमत्व, दूरदर्शीपणा, अत्यंत नेमकेपणे आणि नेटकेपणे प्रकल्प करण्याची हातोटी,यामुळे त्यांचे मैत्र सर्व वयाच्या लोकांशी होते.ते गेले तरी प्रत्येक मनात घर करून राहिलेले त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि कार्य सदैव आपल्या सोबतच राहील. 

मंडळी, अशोकजी किंवा त्यांच्यासारख्या अनेकांनी या मातीत सांभाळून ठेवलेला मराठीचा दिवा अधिक प्रखर करण्याचे काम आपल्याला करायचे आहे.त्याला सर्वांची साथ मिळेल यात शंका नाही! 

आपली नम्र,
बृहन महाराष्ट्र मंडळ अध्यक्षा,
विद्या जोशी