नमस्कार,
नास्ति मातृसमा छाया, नास्ति मातृसमा गतिः।
नास्ति मातृसमं त्राण, नास्ति मातृसमा प्रिया।।

मंडळी,आईचं आपल्या आयुष्यातलं स्थान वेगळं सांगायची गरजच नाही.तिच्या अखंड ऋणात आपण असतोच.परंतु कधीकधी ही भावना शब्दांत तिच्यापर्यंत पोहोचवावीशी वाटतेच.त्याचप्रमाणे,आपल्या मातृभूमीचेही ऋण शब्दातीत आहे.आपल्या अस्तित्त्वाला एक ओळख देणारी.. इथे दूरवर आपल्याला एका धाग्यात बांधून ठेवणारी आपली मातृभूमी तिचाही जन्मदिवस अर्थात महाराष्ट्र दिन.
Mother’s Day आणि महाराष्ट्र दिनाच्या तुम्हा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.
मी म्हटले तसे आपल्याला एका धाग्यात बांधून ठेवणारे ही मराठीपण BMM अधिवेशनाच्या निमित्ताने अधिकच पक्के होणार आहे.हे अधिवेशन आता अगदीच उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. त्यानिमित्ताने अनेक महाराष्ट्र मंडळांशी संपर्क साधता आला. त्या सगळ्यांमध्ये convention प्रती असलेला उत्साह पाहून आमचाही उत्साह द्विगुणित झाला.
सर्वप्रथम ‘अश्रूंची झाली फुले’ च्या निमित्ताने डेट्रॉईट ला भेट दिली.हेमा रचमाले यांचे आतिथ्यशील घर,सुग्रास भोजन आणि जोडीला सुप्रसिद्ध मराठी नाटक.. रसिक मराठी मनाला आणखीन काय हवे! अंजली अंतुरकर,किरण इंगळे,हर्षद आंनिगेरी,अनघा हुपरिकर,नितीन अंतुरकर.. अशा जुन्या मित्रांच्या भेटी,किस्से,कहाण्या आणि मग रात्री २ वाजता जेवणावर मारलेला ताव.केवळ अविस्मरणीयच! मनोज पाटील यांचे संपूर्ण नियोजन कौतुकस्पदच.
बॉस्टन,फिलडेल्फिया आणि न्यू जर्सी येथील भेटींचा अनुभवही मस्त होता.
शिल्पा कुलकर्णीच्या अतिथ्याने अगदी ‘माहेरपण’ अनुभवले.करोनानंतर पहिल्यांदाच झालेले in person NEMM कार्यक्रम,हळदीकुंकू,शोभायात्रा असे सगळे कार्यक्रम पाहता आले. BMM अधिवेशनाचे निमंत्रणही सगळ्यांनी मनापासून स्वीकारले. धन्यवाद स्वाती शिंदे आणि शिल्पा कुलकर्णी.
त्यानंतर फिलडेल्फिया मराठी मंडळाची ५० वर्ष साजरी करण्यासाठी आम्ही फिलीला कूच केली.अतिशय सुबक आणि देखणे नियोजन. प्रत्येक गोष्टीचा बारकाईने केलेला विचार वाखणण्याजोगा होता.आशीष नाडकर्णी आणि सचिन प्रभुदेसाई आणि सर्वच आयोजकांचे आभार.येथेही अधिवेशनाच्या निमंत्रणाला चांगला प्रतिसाद मिळाला.
अतुल आठवले आणि आरती देवधर आठवले यांच्यासोबतचा न्यू जर्सीला परतीचा मजेदार प्रवास,माझी शाळा मैत्रीण पूजा शिरोडकरशी झालेली भेट, अमर आणि रश्मी मुंगळे उरेकर यांचा पाहुणचार..खरंतर हे दिवस संपूच नये असे वाटावे अशी जिव्हाळ्याची माणसं यानिमित्ताने जोडली गेली आहेत.वर्षा कोल्हटकर आणि प्रशांत कोल्हटकर यांचे NJ येथील घर तर जणू माझे दुसरे घर झाले आहे.या सगळ्यांचा निरोप घेऊन नव्या उत्साहाने आपल्या कामाला लागले.
त्यात आपले नैमित्तिक कार्यक्रम ‘मानसिक स्वास्थ्य’,’लेखक तुमच्या भेटीला’ आणि ‘BMM करॉके’ नेहमीप्रमाणेच या महिन्यातही उत्साहात पार पडले. याविषयी अधिक माहितीसाठी पुढील लिंक्सना जरूर भेट द्या. https://www.authorhouse.com/en/bookstore/bookdetails/831789-the-mystery-of-candylandher photo https://chat.whatsapp.com/Dhi3JOMzzke4l19zbdsOm9
आनंदाची गोष्ट म्हणजे BMM जगतिकीकरणांतर्गत नायजेरिया मराठी मंडळ आपल्याशी जोडले गेले आहे.असाच एकएक धागा जोडत संस्कृतीचे महावस्त्र विणले जावे.
मंडळी,तुम्हा सर्वांचे प्रोत्साहन आणि शुभेच्छांमुळे जे काही काम आजवर केले त्याची सुंदर पावती मिळाली आहे.2022 चा साधनाताई आमटे पुरस्कार मला मिळाला आहे. माननीय मुख्यामंत्र्यांच्या हस्ते सत्कार, मानपत्र आणि रोख पंचवीस हजार रुपये हे या पुरस्काराचं स्वरूप आहे. एका थोर सेवाव्रतींच्या नावाने मिळणारा हा पुरस्कार जेवढा आनंददायक आहे तेवढाच जबाबदारीची जाणीव करून देणाराही आहे. या बहुमानाला साजेसे कार्य माझ्या हातून घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
‘जननी जन्मभूमीश्च स्वर्गदपि गरियसि।‘
जगात कुठेही असलो तरी आपल्या मराठी मातीसाठी अखंड कार्य करीत राहण्याचा निश्चय महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने करू या.

जयहिंद ! जय महाराष्ट्र !!

आपली नम्र
बृहन महाराष्ट्र मंडळ अध्यक्षा
विद्या जोश