नमस्कार मंडळी,

मोकळी हवा..
मोकळे आकाश..
मोकळा श्वास आणि मोकळा प्रकाश..! 

शेवटचं कधी भरभरून भेटलो होतो आपण या सगळ्यांना आठवतंय तुम्हाला? पण लवकरच हे सगळं कोविड च्या विळख्यातून सुटण्याच्या आणि पूर्ववत होण्याच्या मार्गावर आहे हे निश्चित.तेव्हा निश्चिंत मनाने २०२२ च्या न्यू जर्सी अधिवेशनाची स्वप्न बघायला हरकत नाही. या तयारीचाच एक भाग म्हणून अधिवेशन होणार त्या जागेची पाहणी करण्याचे ठरले आणि प्रत्यक्ष ‘अटलांटिक सिटी,न्यू जर्सी’ कडे आमच्या तैलरथाने (म्हणजे आमच्या ‘कार’ ने हो!) प्रस्थान केले.तर आपल्या या कनव्हेन्शन सेंटरच्या सफरीचा वृत्तांत तुम्हाला सांगायला नक्कीच आवडेल.

अटलांटिक सिटी. न्यू जर्सीतील ‘कसिनो चे शहर’ म्हणून ओळखले जाणारे हे शहर वेगवेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण आशा रिसॉर्टससाठी प्रसिद्ध आहे.त्याचप्रमाणे अथांग असा समुद्र आणि बोर्डवॉक ही याची वैशिष्टये.असं हे धमाल शहर म्हणजे अमेरिकेतला महत्त्वाचा टुरिस्ट स्पॉट.शहराची उत्साही हवा अंगावर घेतच आम्ही पोचलो ते आपल्या नियोजित कन्व्हेंशन सेंटरला.भव्य तीन मजली इमारत,२५-३० खोल्या आणि एकचवेळी ६००० लोक मावतील एवढी व्याप्ती असलेलं हे कन्व्हेंशन सेंटर.पाहताक्षणी लक्ष वेधून घेणारी अप्रतिम बांधणी आणि सर्व सोयींनी सुसज्ज असलेलं हे ठीकाण अधिवेशनाचा अविस्मरणीय अनुभव देईल यात शंका नाही.येथून जवळच टॉपिकाना,सीझर,हराह अशी अद्ययावत हॉटेल्स आपापल्या वैशिष्ट्यपूर्ण थीम्सनी आपल्याला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात.कन्व्हेंशन सेंटर पासून या हॉटेलपर्यंत नेणाऱ्या जिटनी या छोट्या बसेसही आहेत. आज ही सगळी हॉटेल्स जवळपास पूर्ण भरलेली गजबजलेली दिसली. याचाच अर्थ करोंनाची भीती आता बरीच कमी झाली आहे हे नक्की. पण मंडळी नुसतं ठिकाण प्रेक्षणीय असून काही उपयोग नाही.यजमानही तितकेच उत्साही आणि अगत्यशील असावे लागतात.मला सांगायला आनंद वाटतो की अत्यंत उत्साही,कल्पक,येणाऱ्या पाहुण्यांसाठी अजून काय नवीन करता येईल याचा सतत विचार करून त्यासाठी झटणारे असे आपले आयोजक आणि कार्यकर्ते आहेत.त्यांची तयारी पाहून अधिवेशनाची उत्सुकता आणि अधीरता शिगेला पोचली आहे.हा एक वेगळाच धमाल अनुभव घेण्याची संधी आपण अजिबात चुकवू नये असे मी म्हणेन.

मंडळी, एका प्रसिद्ध शायरने म्हटले आहे, ‘मैं तो अकेला ही चला था जानिब ए मंजिल मगर लोग जुड़ते गए कारवां बनता गया।‘ प्रत्येक चांगल्या कामाच्या बाबतीत असंच काहीसं घडत असतं नाही का!

 चला तर मग येणारं BMM अधिवेशनही आपण एकमेकांच्या साथीने असंच दणक्यात यशस्वी करू या !

बृहन महाराष्ट्र मंडळ अध्यक्षा
विद्या जोशी