सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा, दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा 

                        जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा…….

शिवतेजाच्या उज्ज्वल प्रकाशाने उजळून गेलेल्या, तसेच थोर संत-पंत, कवी, लेखक, समाजसेवक, स्वातंत्र्यसैनिकांची दैदिप्यमान, उज्वल परंपरा लाभलेल्या आपल्या महाराष्ट्र राज्याच्या संस्कृतीला गौरवशाली इतिहासाचा वारसा लाभला आहे. ह्याचबरोबर आपले सणवार, प्रांतानुसार विभागलेली जातीरचना, वेशभूषा, चालीरीती, बोलीभाषा आणि ह्या सगळ्याचा केंद्रबिंदू म्हणजे आपली ‘मराठी खाद्यसंस्कृती’ होय.  खाद्यसंस्कृती ही आपले संस्कार, चालीरीती, परंपरांशी घट्ट जोडून ठेवणारा अविभाज्य घटक आहे. शिवाय त्यातली वैविध्यता, ऋतुमानानुसार आणि मुख्य म्हणजे सण-वारांशी निगडित असलेले ह्याचे महात्म्य ह्यालासुद्धा तितकेच आपल्या मराठी मनात अभिमानाचे स्थान आहे आणि जिव्हाळ्याचा एक कोपरा आहे. सगळ्या मराठीजनांना एकत्र गुंफून ठेवणारा तो जणू एक गोफ आहे. मराठी संस्कृतीच्या पाऊलखुणांचा वेध घेताना, त्या जतन करताना ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ ह्या उक्तीनुसार आपल्या खाद्यप्रकारांना उजाळा देऊन त्याची भावी पिढीला ओळख करून देणे हे पण आपले उद्दिष्ट आहे. हे व ह्यासारखे संस्कृतीशी दुवा साधणारे अनेक पैलू लक्षात घेऊन मराठी अधिवेशनांचा श्रीगणेशा झाला.     

       कुठल्याही अधिवेशनाच्या यशाचे गमक जितके उत्कृष्ट व्यवस्था, अचूक नियोजन, दर्जेदार कार्यक्रम आणि त्याचे व्यवस्थापन ह्यांच्यामध्ये आहे, तितकेच ते स्वादिष्ट, सुग्रास आणि वैविध्यपूर्ण भोजनात सुद्धा आहे. उपस्थित जनमानसाचे हृदय जिंकायचा मार्ग हा तृप्तीची ढेकर देणाऱ्या पोटाकडूनच जातो. अशा अनेक मुद्द्यांचा आढावा घेऊनच मग आपल्या मराठी बांधवाना नेहमीपेक्षा काहीतरी खास व हटके देण्याच्या ध्यासातून ‘स्वाद न्यू जर्सीचा’ ही पाककृती स्पर्धा उदयाला आली. ह्या स्पर्धेच्या नियोजनाचे निमित्त साधून आपल्या २०२२ मध्ये होणाऱ्या आगामी मराठी अधिवेशनाबद्दल समस्त न्यू जर्सीकरांच्या मनात एक कुतूहल आणि उत्कंठा निर्माण करणे हा सुद्धा ह्यामागील हेतू होता. ह्या स्पर्धेची विशेष खासियत म्हणजे ह्या स्पर्धेच्या निमित्ताने परीक्षकांनी निवडलेल्या विजेत्या पाककृतीचा समावेश हा पुढील वर्षी होणाऱ्या आपल्या मराठी संमेलनामध्ये एखाद्या दिवशीच्या जेवणामध्ये समाविष्ट करून आपल्याला तो चाखायला मिळणार आहे. स्पर्धा फक्त न्यू जर्सीमधल्या सर्व स्पर्धकांसाठी आयोजित केलेली होती. भारतामधले सुप्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ श्री. विष्णू मनोहर ह्यांनी पुढील वर्षीच्या आपल्या अधिवेशनासाठी येण्याचे मान्य केले आहे. त्यांनी दिलेल्या रेसिपी त्यांच्या देखरेखीखाली अधिवेशनाच्या जेवणाचा भाग असणार आहेत. असा सुवर्णकांचन योग मराठी अधिवेशनात प्रथमच आपल्या नशिबी लाभणार आहे.

           फेसबुकसारख्या जनमानसात पसरलेल्या माध्यमांद्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ह्या स्पर्धेची कलात्मक रीतीने जाहिरात केली गेली. स्पर्धेचे स्वरूप, पदार्थाची विभागणी, त्याची मांडणी, वगैरे नियम आखले गेले. स्पर्धा जाहीर झाल्यापासून ते मग स्पर्धकांची ह्यासाठी नोंदणी, पेश केल्या जाणाऱ्या पदार्थाची रेसिपी आगाऊ पाठवणे, स्पर्धकांच्या नावांच्या याद्या, स्पर्धेची जागा, मांडणी, जागेची सजावट ह्यासारख्या अनेक बाबी फूड कमिटीच्या प्रमुख, सौ. पूजा शिरोडकर हिच्या मार्गदर्शखाली, तिच्या टीमच्या मदतीने एकदम धडाक्यात पार पडल्या.

          मराठी विश्व कम्युनिटी सेंटरच्या वास्तूमध्ये आपली ही पारंपरिक पदार्थांची पाककृती स्पर्धा पार पडली. अगदी छोटेखानी सोहळा शोभेल थाटात उत्कंठावर्धक स्पर्धा सुरु झाली आणि तेवढ्याच जल्लोषात संपन्न झाली. वेगवेगळ्या वयोगटातल्या तब्बल ४२ उत्साही स्पर्धकांनी भाग घेतला, ह्यात पुरुषवर्गाचा आणि युवापिढीचासुद्धा समावेश होता हे खास नमूद करावेसे वाटते. अत्यंत नाविन्यपूर्ण किंवा पारंपारिक अशा पद्धतीच्या रेसिपी निवडल्या. इथे उपलब्ध असणाऱ्या जिन्नसा निवडून, त्याला मराठी टच देऊन स्पर्धकांनी त्या बनवल्या, स्पर्धेच्या ठिकाणी आणल्या आणि कलाकुसरीने, वैविध्यपूर्ण रीतीने त्याची आकर्षक व अगदी नजर खिळवून ठेवणारी मांडणी केली. ही टेबलदेखील स्वयंपाकाशी निगडित अनेक गोष्टींनी अतिशय सुंदर सजविली होती. सुरेख रंगसंगतीचा मेळ घालून जणू पदार्थांची रांगोळीच टेबलांवर मांडल्याप्रमाणे भासत होती. फूड कमिटीच्या मेंबर्स सुरेख साड्या नेसून आपल्या स्वागतासाठी सुहास्य वदनाने सज्ज होत्या. ह्या सगळ्या हालचालींमध्ये, लगबगीमध्ये एक प्रकारची लय निर्माण झाली होती. न्यू जर्सीतल्या अनुभवी, जेष्ठ आणि आमच्या सर्वांच्या लाडक्या साक्षात अन्नपूर्णा, सौ. मीनाताई देशपांडे आणि सौ. मोनाताई वासुदेव ह्या दोघींनी मिळून परीक्षकाची कठीण भूमिका पार पाडली. त्याबद्दल दोन्ही परीक्षकांचे आम्ही सगळे मनापासून आभार मानतो. ह्या दोघीजणी यावर्षी अधिवेशनाच्या फूड कमिटीच्या सल्लागार आहेत. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात शंभराहून जास्त लोकांच्या उपस्थितीत स्पर्धा उत्तरोत्तर रंगत गेली आणि मग शेवटी शिगेला पोहोचलेली उत्कंठा संपली. अनेक चविष्ट पदार्थांमधून केवळ २ विजेते निवडायचे म्हणजे आपल्या परीक्षकांचे सारे कौशल्य पणाला लागले होते.

विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे:

(Veg catagory) प्रथम पारितोषिक- अर्चना हरहरे (अळूची भाजी)

(Non-veg catagory) प्रथम पारितोषिक- वासुदेव गाडगे (ग्रीन चिकन मसाला)

आणि युवा पिढीतल्या शान सावंत (व्हाईट मटण करी) अशा दोघांना विभागून देण्यात आले.

      निकाल जाहीर झाल्यानंतर विजेत्यांबरोबरच सगळ्या भाग घेतलेल्या स्पर्धकांना मेडल देऊन गौरवण्यात आले, त्यांना शाबासकीची, कौतुकाची थाप देण्यात आली. ह्यानंतर प्रत्येकाची पाककृती जमलेल्या सगळ्यांना चाखायला मिळाली. स्पर्धकांना सगळ्यांनी मनापासून दाद दिली. स्पर्धा सर्वांगाने परिपूर्ण असण्यासाठी आपल्या फूड कमिटी प्रमुख सौ. पूजा शिरोडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अथपासून इतिपर्यंत अपार मेहनत घेतली होती.

      शानदार रीतीने संपन्न झालेला हा सोहळा नेहमीच आपल्या स्मरणात राहणार आहे. भारतामधले सुप्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ श्री विष्णू मनोहर ह्यांनी विडिओ माध्यमाद्वारे स्पर्धा चालू असताना सगळ्यांना शुभेच्छा दिल्या. ही स्पर्धा सुरळीतपणे पार पाडण्याकरिता केलेल्या सहकार्यासाठी, मदतीसाठी आणि योजनाबद्ध नियोजनासाठी आपले संयोजक श्री. प्रशांत कोल्हटकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे कौतुक करावेसे वाटते.

‘स्वाद न्यूजर्सीचा’आपल्या होऊ घातलेल्या भव्यदिव्य अधिवेशनाची झलक होती असे म्हणायला हरकत नाही.

 आता नक्की भेटूया अधिवेशनाला ११-१४ ऑगस्ट, २०२२.

 एक नाद, एक घोष, चाले न्यू जर्सीच्या भूमी,

 धरू वाट अधिवेशनाची, ठेवून सदिच्छा मनोमनी.

 

सौ. नीता पुरव